कोल्हापूर न्यूज नेटवर्क
ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ . जी . पी .माळी यांच्या "सुवर्णगंध " या बाराव्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ नुकताच "अक्षरदालन " कोळेकर तिकीट, कोल्हापूर येथे प्रतीतयश अनेक दिग्गज साहित्यिकांच्या उपस्थितीत पार पडला . या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे होते "सुवर्णगंध "या पुस्तकाला ज्यांची प्रस्तावना लाभली ते शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिवडॉ. व्ही एन . शिंदे तर प्रमुख वक्ते होते प्रसिद्ध व्याख्याते ,समीक्षक शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी. एम. हिर्डेकर व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक श्री सतीश भारतीय अध्यक्ष होते बेळगाव येथील "राष्ट्रवीर" चे संपादक आणि दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजाभाऊ पाटील आणि अक्षरदालन प्रकाशनचे राजाभाऊ जोशी .आणि यांच्यासमोर बसलेले होते सांगली ,सातारा , पुणे व कोल्हापूरहून आलेले अनेक साहित्यिक , इतिहास संशोधक , आणि साहित्यप्रेमी .. अशा साहित्यिकांच्या मांदियाळीत "सुवर्णगंध " चे प्रकाशन झाले .
या पुस्तकामध्ये लेखक प्राचार्य डॉ .जी .पी . माळी यांनी महाराष्ट्रातील विविध राजकीय ,सामाजिक ,शैक्षणिक व कृषी क्षेत्रातील 20 मान्यवर व्यक्तिमत्त्वांना शब्दबद्ध केले आहे आणि त्यामध्ये शिक्षण चळवळीसाठी गेली 45 वर्षे झोकून देणारे आमचे नेते भरत रसाळे सर यांच्यावरही लेख लिहिला गेला आहे .आम्हाला अभिमान यासाठी आहे की या "सुवर्णगंध " मध्ये स्त्री शिक्षणाचे प्रणेते *महात्मा ज्योतिराव फुले , ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ . एन . डी .पाटील , लोकनेते आर . आर (आबा ) पाटील , स्वामीकार रणजीत देसाई , जेष्ठ साहित्यिक डॉ . सुनीलकुमार लवटे , डॉ . हरीश भालेराव व इतर जिल्ह्यातील निवडक अशा वीस दिग्गजांची व्यक्तीचित्रे रेखाटली आहेत . त्यांच्या पंक्तीत भरत रसाळे सर आहेत . शिक्षण क्षेत्रातील " सेवा दलात वाढलेला कार्यकर्ता : भरत रसाळे " या शीर्षकाखाली सरांच्या कार्याचा आढावा यामध्ये घेण्यात आला आहे . आम्हाला माहीत नसलेले भरत रसाळे सर या लेखातून अनुभवायला मिळाले . सरांना दिग्गजांच्या पंक्तीत लेखक डॉ . जी .पी . माळी यांनी स्थान दिले हे आम्हाला अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे .
"ज्यांच्या पायावर डोकं ठेवावं अशी व्यक्तिमत्वं समाजात कमी आहेत . अशा काळात समाजात चांगुलपणा शोधत व्यक्तिचित्रे रेखाटणे व ती समाजापुढे आणणे ही बाब उमेद वाढवणारी आहे . प्राचार्य डॉ .जी .पी .माळी यांनी "सुवर्णगंध " पुस्तकातून वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती चित्रांचा प्रवास मांडून समाज मनाचेही जीवन सुगंधित केले आहे" ,अशा भावना कुलसचिव डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केल्या , तर डॉ . बी .एम . हिर्डेकरांनी डॉ .जी .पी .माळी यांनी समाजातील पैलू पाडलेले हिरे शोधून त्यांना शब्दबद्ध करण्याचे अवघड काम सहज सोप्या भाषेत लिलया पूर्ण केले आहे . ही किमया फक्त तेच करू शकतात अशी शाब्बासकी डॉ .माळी यांना दिली .
स्वतः लेखक डॉ .जी .पी . माळी यांनी आपल्या मनोगता दरम्यान लेखन प्रवास व विविध टप्प्यावरील अनुभव सांगताना आपल्या बाराव्या साहित्यकृतीत "पुस्तकात न मावणारी माणसं मी शब्दबद्ध केली आहेत" असे प्रांजलपणे नमूद केले .
प्राचार्य डॉ. पी जी माळी यांच्यासारख्या नामवंत लेखकांनी समितीचे राज्याध्यक्ष व पतसंस्थेचे संस्थापक भरत रसाळे सर यांच्या बद्दल लेखन करणे ही सर्व समिती, पदाधिकारी कार्यकर्त्यांना अभिमानाची बाब आहे. म्हणून समितीच्या व पतसंस्थेच्या वतीन जेष्ठ मार्गदर्शक महावीर सिदनाळे यांच्या हस्ते भरत रसाळे सरांचा सपत्नीक भव्य असा सत्कार करण्यात आला. यावेळी सौ. रसाळे वहिनी , राज्य सचिव शिवाजी भोसले , पतसंस्था चेअरमन मच्छिंद्र नाळे ' शेलाजी वन्नाजी संघवी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. देशपांडे मॅडम , समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी , संचालक , सल्लागार , पतसंस्था कर्मचारी , शिक्षक बंधु भगिनी आदी उपस्थित होते.
---------------------------------------

