कोल्हापूर न्यूज नेटवर्क
जनतेचे समाधान करण्यासाठी ज्यांना सत्तेवर बसवले आहे त्यांच्याकडून समाधान करण्याची नैतिक जबाबदारी कमी होत आहे.ही परिस्थिती बदलण्यासाठी आता सर्वसामान्य जनतेनेही पुढे यावे, सूर्यकिरणांची वाट न पाहता आपणच ज्योत व्हावे असे आवाहन नोबेल शांतता पुरस्कार विजेते डॉ कैलास सत्यार्थी यांनी केले.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती आणि डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण समुहाचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या एकसष्टीनिमित्त आयोजित त्यांच्या सत्कार समारंभात डॉ. सत्यार्थी बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार शाहू महाराज छत्रपती होते.
प्रारंभी आमदार सतेज पाटील यांनी स्वागत करताना संजय डी. पाटील यांच्या कतृत्वाचा आढावा घेतला. कष्ट आणि जिद्दीच्या जोरावरच त्यांनी आपले वेगळे जग निर्माण केले, यश मिळवल्याचे स्पष्ट केले. भालबा विभुते यांनी संपादित केलेल्या ध्यासपर्व या संजय पाटील यांच्या गौरव ग्रंथाचे व शिक्षणाविषयीच्या दुसऱ्या ग्रंथाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना संजय डी. पाटील म्हणाले, चाळीस वर्षात प्रचंड काम करताना समोर आले ते स्वीकारले. नम्रतेने आणि प्रामाणिकपणे काम केले. कोल्हापुरात लवकरच बिझनेस मॅनेजमेंट स्कूल सुरू करण्याची मोठी इच्छा आहे. कोल्हापूरकरांसाठी जेवढं काही करता आले, ते केलं आणि यापुढेही करत राहीन असेही ते म्हणाले. पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील विदयापीठाचे कुलपती पी.डी. पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी संजय पाटील यांच्या धाडसी निर्णयाचे आणि कष्टातून मिळविलेल्या यशाचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात खासदार शाहू महाराज यांनी संजय डी. पाटील यांच्या शिक्षण, आरोग्य, शेती या सर्व क्षेत्रातील कार्याचे कौतुक केले.
व्यासपीठावर पद्मश्री डॉ डी. वाय. पाटील, सौ शांतादेवी डी. पाटील, सतेज पाटील,वैजयंती संजय पाटील, डॉ पी. डी. पाटील, आमदार जयंत आसगावकर उपस्थित होते.
---------------------------------------

