मुंबई : 'आग्रातून सुटका करून घेण्यासाठी पेटाऱ्यांचा वापर करण्यात आला नव्हता. तर छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परत आले होते., असा खळबळजनक दावा अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केला होता. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते चर्चेत आले असून वाद निर्माण झाला आहे. राहुल सोलापूरकर यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे.
मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले हाेते. राहुल सोलापूरकर यांनी सांगितले की, 'पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्यातून सुटून आले होते. आग्र्यातून सुटका करण्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवला याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोला देखील लाच दिली होती. तसंच, 'मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतले होते. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. त्याची खुण आणि पुरावे देखील आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती. मात्र हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हटलं की थोडं रंगवून सांगावं लागतं. मात्र रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो.', असे वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका व्यक्त केली असून राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात घणाघाती टीका केली आहे. “राहुल सोलापूरकरने अतिशय विकृत विधान केले असून त्याची जीभ हासडली पाहीजे, तसेच महापुरूषांची बदनामी करणाऱ्यांवर देशद्रोहाच्या कायद्यानुसार कारवाई करावी”, "त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत"अशी संतप्त भूमिका उदयनराजे भोसले यांनी मांडली आहे.
-----------------------
युती सरकारच्या काळात महापुरुषांचा सातत्याने अपमान केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान हे सरकार पाहत आहे हे दुर्दैवी आहे. सरकारच जर महापुरुषांचा अपमान करु लागले तर राहुल सोलापुरसारखे लोकही त्याच पद्धतीने सरपकारच्या मागे भुंकत असतात. सरकारच्या मानसिकतेचा परिणाम लोकांवर झाला आहे, म्हणूनच ते महापुरुषांचा अपमान करण्याची हिम्मत करु शकतात. कलाकार असला म्हणजे त्याला काय वेगळी शिंगं नाही फुटत, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्याला पायबंद घातलाच पाहिजे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे .
------------------------------------------------


