पुणे:माजी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांचे चिरंजीव ऋषिराज सावंत बँकॉकला जाण्यासाठी ग्लोबल हँडलिंग सर्व्हिसेस या कंपनीचे विमान बूक केले. यासाठी त्यांनी तब्बल 68 लाख रुपये खर्च केले. एवढे करूनही ऋषिराजला बँकॉकला जाता आले नाही. कारण त्याने बँकॉकला जाणे हे त्याच्या पत्नीला तसेच वडिलांना मान्य नव्हते. मात्र ऋषिराजने कोणाचेही न ऐकता त्याचे दोन मित्र संदीप वसेकर आणि प्रवीण उपाध्ये या दोघांना सोबत घेऊन पुण्यावरून बँकॉकसाठी निघाला.
ऋषिराज बँकॉकसाठी निघल्याची माहिती मिळताच तानाजी सावंत यांनी त्याला थांबवण्यासाठी आपली पूर्ण राजकीय ताकदच पणाला लावली. ऋषिराजने सायंकाळी 4.30 वाजता बँकॉकला जाण्यासाठी उड्डाण केले. यावेळी त्यांच्या प्रायव्हेट विमानात तो आणि त्याचे दोन मित्र होते तसेच विमानात कॅप्टन परीक्षित अग्निहोत्री, कॅप्टन श्रेष्ठ अग्निहोत्री आणि एअर होस्टेस जॉयश्री नाथ हे तीन क्रू मेंबर होते.
.. आणि हालचाली गतिमान झाल्या
ऋषिराजने उड्डाण केल्याचे समजताच तानाजी सावंत यांनी त्यांच्या राजकीय ताकदीचा वापर सुरू केला. त्यांनी चिंचवड येथील भाजप आमदार शंकर जगताप यांची मदत घेतली. त्यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांशी संपर्क झाला आणि वेगाने पुढील सूत्रे फिरण्यास सुरू झाली.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून पुणे पोलिसांना सूचना देण्यात आल्या, त्यानुसार अपहारणाची खोटी तक्रार दाखल करण्यात आली. कारण हवेत प्रवास करत असलेले विमान परत बोलावण्यासाठी पोलिसांना ठोस कारण हवे होते. त्यासाठी ऋषिराजचे अपहरण झाल्याची तक्रार देण्यात आली. याचवेळी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनाही याबाबत निरोप देण्यात आला.
मुरलीधर मोहोळ यांनी डायरेकटर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन कार्यालयाला सूचना केली. तिथून एअर ट्राफिक कंट्रोलला सूचना देण्यात आल्या. एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून विमानाचे पायलट परीक्षित अग्निहोत्री आणि श्रेष्ठ अग्निहोत्री यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु झाला. तोपर्यंत हे विमान बंगालच्या उपसागरावर पोहोचले होते. एअर ट्राफिक अथॉरिटीकडून या दोन्ही पायलट्सना परत फिरण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र ही बाब विमानात पाठीमागे बसलेल्या ऋषीराजला कळू देण्यात आली नाही.
हे विमान रात्री 8.45 वाजता पुणे विमानतळावर पोहोचले. ऋषीराजचा समज मात्र आपण बँकॉकला पोचल्याचा होता. त्यामुळे तो विमानातून जेव्हा बाहेर आला तेव्हा त्याला धक्का बसला.कारण बँकॉकला जायला निघालेला ऋषीराज सव्वाचार तासांचा प्रवास करून पुन्हा पुण्यातच पोहचला होता.
--------------------------------

