बारामती : ऊस हे पाणी पिणारे पीक असूनही कमीत कमी पाण्यामध्ये आणि कमी हेक्टरमध्ये आपण ऊसाचे अतिरीक्त उत्पादन घेऊ शकतो, हे केवळ एआय तंत्रज्ञानामुळे शक्य होत आहे. शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान त्यांच्या शेतात अवलंबल्यास येत्या ३-४ वर्षात एआयच्या वापरामुळे ऊस उत्पादनासह अर्थकारणात क्रांतीकारक बदल होतील, असा विश्वास ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केला.
साखर उद्योगाला नवी झळाळी प्राप्त करून देण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावीपणे वापर करण्यासंदर्भात विस्मा अर्थात वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन आणि अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथे आयोजित विशेष कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. बारामती येथील शारदानगर शैक्षणिक संकुलातील मंथन सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर खासदार सुप्रिया सुळे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख आणि अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार, साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळे निमित्त बारामती जवळील कृषी विज्ञान केंद्रात ऊसाची प्रात्यक्षिक पाहणी करून एआय तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ऊस उत्पादनामध्ये एआय तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी विस्मातर्फे ११ लाख रूपयांची देणगी जाहीर करण्यात आली.
--------------------------------------------



