वैष्णवीचा हुंडाबळी म्हणजे महाराष्ट्राच्या प्रगत समाजाला लागलेला कलंक.

Kolhapur news
By -

               




             


कोल्हापूर न्यूज-वि.रा.भोसले


वैष्णवीचा हुंडाबळी ही एक अत्यंत निंदनीय व लाजीरवाणी घटना आहे. समाजाचे राजकीय पुढारपण करत असल्याचा दावा  करणाऱ्या हगवणे कुटुंबाने हे कृत्य केले आहे. आपण एका मोठ्या राजकीय नेत्याचे कार्यकर्ते आहोतअसा दावा करून त्याने त्या प्रतिष्ठित नेत्याची सुद्धा बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे.  पुरोगामी  महाराष्ट्राच्या प्रगत समाजाला लागलेला तो एक कलंकच म्हणावा लागेल. 

    महाराष्ट्रभर या घटनेची चर्चा व निंदा होत आहे. हलवणे यांची दुसरी सून सुद्धा या हुंडाबळीचा निषेध करत आहे. 

     ही घटना म्हणजे एक निर्दयी कौटुंबिक गुन्हेगारी असून गुन्हेगारांना   न्यायदेवता शासन दिल्याशिवाय राहणार नाही. तथापि हे असले प्रकार रोखता आले पाहिजेत. प्रगत समाजात दिमाखाने वावरणाऱ्या हगवणे कुटुंबातील माणसांचे कौटुंबिक संस्कार किती खालच्या पातळीचे आहेत हे यावरून समजते. शर्यतीच्या बैलाचा वाढदिवस साजरा करण्याकरिता गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम या कुटुंबाच्या प्रमुखांनी ठेवला होता. म्हणजे बैलापेक्षा स्त्रीचा दर्जा  खालचा आहे हे या कुटुंबाने दाखवून दिले होते. स्त्रीची अशी जर अवहेलना होत असेल तर अशा कुटुंबाला प्रायश्चित मिळालेच पाहिजे. 

    आज  वैष्णवी चा बळी गेला .महाराष्ट्र सरकारच्या दोन कोटी लाडक्या बहिणी आहेत. त्यांच्या मध्ये सुद्धा वैष्णवी  असतील.त्यांच्या रक्षणाची ही जबाबदारी घेतली गेली पाहिजे. त्यांना केवळ राखीची भेट देऊन भागणार नाही.  न्याय देवता त्यांना प्रायश्चित देईलच पण समाजाने सुद्धा यासाठी कंबर कसली पाहिजे. त्यातही विशेषतः युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे. 

   छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रात स्त्री सन्मानाची एक प्रभावी चळवळ उभी राहिली पाहिजे.

    सोशल मीडियावर एका कवयित्रीने सादर केलेली कविता फारच बोलकी आहे. दसऱ्याला दरवर्षी जळणारा  रावण समोरच्या गर्दीला उद्देशून म्हणतो ;


   "एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून दरवर्षी तुम्ही मला जाळता ,पण मी कोणत्याही स्त्रीवर अत्याचार केला नव्हता उलट सन्मान केला होता. परस्त्रीवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या समाजात तुम्हीं वावरता.तुमच्यातला राम आधी तुम्ही शोधा आणि मग मला जाळा ".


    हगवणे कुटुंब रावणाला सुद्धा मागे टाकते.


    विश्वास तरी कोणावर ठेवायचा ! , समाजाचे प्रबोधन करण्याचे ढोंग करणाऱ्या आजरा तालुक्यातील एका कीर्तनकाराने 

 दागिन्यासाठी आपल्या बायकोचा खून केला आणि वर दरोडा पडल्याचा आव आणला.


याला प्रगत समाज म्हणायचे का ?


      महाराष्ट्रातल्या युवकांनो तुम्हालाच आता ही चळवळ हाती घ्यावी लागेल.


       -----------------------------