No title

Kolhapur news
By -

 

           

        


               कोल्हापूर न्यूज नेटवर्क


      कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणात येणाऱ्या ४२ गावांचा विकास आराखडा तयार करताना तो कोल्हापूर शहराशी सुसंगत असेल, याची काळजी घ्यावी. त्यासाठी नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड विकास प्राधिकरणांच्या विकास आराखड्यांचा सविस्तर अभ्यास करावा, अशा सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.


कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचा आराखडा तयार करताना इतर प्राधिकरणांच्या कामकाजाचा अभ्यास करावा किंवा त्यांच्या प्रतिनिधींशी बैठक घ्यावी. आराखड्यामध्ये रस्ते, उद्याने, आरोग्य सुविधा, शाळा, रिंग रोड, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन यांचा प्राधान्याने समावेश करावा. तसेच प्राधिकरण क्षेत्रातील शासकीय जमिनींचे सर्वेक्षण करून माहिती संकलित करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. 


शासनाच्या नियमांनुसार प्राधिकरणाची समिती गठित करावी. विकास आराखड्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात यावी. प्राधिकरणाचे काम सुरळीत आणि गतिमान होण्यासाठी शासनस्तरावरील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला  जाणार असल्याचे पालकमंत्री आबिटकर यांनी यावेळी सांगितले. 


या बैठकीस आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडीक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, उपजिल्हाधिकारी डॉ.संपत खिलारी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, महापालिका उपायुक्त पंडित पाटील आणि प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कदम उपस्थित होते.

     ----------------------------------