कोल्हापूर न्यूज नेटवर्क
लोकांचे जीवनमान बदलण्यासाठी संख्याशास्त्र हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे संख्याशास्त्रज्ञांनी स्वतःच्या परीघाबाहेर जाऊन सामाजिक समस्यांचा शोध आणि वेध घेतला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत डॉ. अभय बंग यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात आजपासून ‘अॅडव्हान्सेस इन स्टॅटिस्टिकल मेथड्स, डेटा सायन्स अँड ऑफिशियल स्टॅटिस्टिक्स’ या विषयावरील तीनदिवसीय संख्याशास्त्र आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ झाला. त्यावेळी बीजभाषण करताना डॉ. बंग बोलत होते. अमेरिकेतील मिसीसिपी स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉ. प्रकाश पाटील यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.
डॉ. अभय बंग यांचे ‘लोकांसमवेत संशोधन’ या विषयावर अतिशय प्रबोधक बीजभाषण झाले. संख्याशास्त्रज्ञांसह सर्वच संशोधकांसाठी त्यांनी आपल्या गडचिरोली येथील सोसायटी फॉर एज्युकेशन, अॅक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ (सर्च) या संस्थेमध्ये आदिवासी समाजाच्या संदर्भात केलेले विविध आरोग्यविषयक प्रयोग व प्रकल्पांमध्ये संख्याशास्त्र कसे उपयुक्त ठरत गेले, याविषयी सादरीकरण केले. ते म्हणाले, व्यापक सामाजिक कल्याणाच्या दृष्टीने संख्याशास्त्राचा वापर केला जाणे गरजेचे आहे. संशोधकांनी सुविधांनी सुसज्ज ठिकाणी जाण्याऐवजी जिथे समस्या आहेत, अशा ठिकाणी जाण्याला प्राधान्य देण्याची गरज आहे. तिथे समस्या सोडवणुकीच्या अनेक शक्यता सामोऱ्या येतात. लोकांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे, निरीक्षण केले पाहिजे, व्यापक माहिती मिळविण्यासह त्या माहितीचे विश्लेषण केले पाहिजे. त्यातून उपयुक्त संशोधन साकार होते. ज्ञान ही आजघडीची सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे.
आज संशोधकाला संशोधन निधी, लोकप्रियता या बाबी मोठ्या प्रमाणात मिळतात, पण या साऱ्या भोवतालात लोकांचे काय, हा प्रश्न घेऊन जो उभा राहतो, तो खरा संशोधक असतो. त्यामुळे लोकांविषयी संशोधन, लोकांसाठी संशोधन हे दोन टप्पे योग्य आहेत, पण परिपूर्ण नव्हेत. त्यापुढे जाऊन संशोधकांनी लोकांसमवेत संशोधन हा मार्ग स्वीकारला पाहिजे. त्यातून भरीव असे काही हाती लागू शकेल. त्याही पुढे जाऊन लोकांकडून संशोधन हा सर्वात आदर्श टप्पा मानला पाहिजे, पण हा पल्ला अद्यापही खूप दूरचा आहे. मात्र, तो लवकरच साकार होईल, या विषयी आपण सकारात्मक, आशावादी असल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा गांधी यांच्या हिंद स्वराज, ग्राम स्वराज या पुढे जाऊन या देशामध्ये आरोग्य स्वराज निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ डॉ. अनिल गोरे म्हणाले, सर्च हा अतिमहत्त्वाचा समाजाभिमुख उपक्रम आहे. तिथे आदिवासींच्या आरोग्याविषयी मूलभूत संशोधन केले जाते. अगदी गुडघेदुखी, पाठदुखीविषयीही काळजी वाहिली जाते. कारण हे अवयव आदिवासी समाजाच्या थेट मिळकतीशी संबंधित आहेत. त्यामुळे या व्याधींनी ग्रस्त व्यक्तीला वेदनाशामक औषधाऐवजी जागृती आणि शारीर उपचारांनी बरे करण्याकडे कल असतो. हे बंग दांपत्याच्या समाजस्वास्थ्य कार्याचे वेगळेपण आहे.
आपल्या उद्घाटनपर मनोगतामध्ये ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ डॉ. प्रकाश पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीमत्त्वांचे येणे महत्त्वाचे आहे. परिषदेमध्ये सहभागी नवसंशोधक, अभ्यासकांना या सर्वांशी संवाद साधण्याची मोठी संधी प्राप्त झाली आहे. तिचा त्यांनी लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठाचे संख्याशास्त्रज्ञ कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के हे समकाळातील एक महत्त्वाचे संशोधक आहेत. त्यांचा या निमित्ताने होत असलेला सन्मानही खूप महत्त्वाचा आहे.
यावेळी सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी परिषदेच्या स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले. संख्याशास्त्र अधिविभागाचे प्रमुख तथा परिषद समन्वयक डॉ. शशीभूषण महाडिक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. सोमनाथ पवार यांनी आभार मानले.
-----------------------------