शेतातील घरातून स्वअभ्यास करत नानीबाई चिखलीचा दीपक झाला पीएसआय

Kolhapur news
By -

 

           



                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


    कागल तालुक्यातील नानीबाई चिखली येथील शेतकरी कुटुंबातील दीपक सुनील तुकान याने जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील  शेतकरी कुटुंबातील दीपकच्या या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी शहरात जाऊन कोचिंग घेण्याऐवजी दीपक यांनी आपल्या शेतातील घरात राहूनच स्वअभ्यासाच्या जोरावर तयारी केली. ग्रामीण भागात मर्यादित साधनसामग्री असूनही त्यांनी सातत्याने अभ्यास करत हे यश मिळवले आहे .  दीपक दररोज सकाळी वडिलांच्या बरोबर शेतामध्ये असणाऱ्या घरामध्ये अभ्यासासाठी जात असत. पीएसआय ची परीक्षा उत्तीर्ण होणारा दीपक हा नानीबाई चिखलीतील पहिलाच विद्यार्थी आहे. 


दीपक तुकान यांचे प्राथमिक शिक्षण कुमार विद्यामंदिर चिखली येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण एम. डी. विद्यालय येथे पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर येथील विवेकानंद कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले. पुढे त्यांनी राहुरी कृषी विद्यापीठातून बीटेक पदवी प्राप्त केली.


दीपक यांच्या या यशाबद्दल गावातील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, मित्रपरिवार तसेच नातेवाईकांसह सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन हाेत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचे हे यश प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या यशाचे श्रेय त्यांनी आपले आई-वडील ,चुलते आणि कोल्हापूर मधील सरदार सर व अतिग्रे सर या मार्गदर्शकांना दिले आहे. भविष्यात प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत समाजसेवा करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.




       -----------------------------------