कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य अंशतः अनुदान प्राप्त (2005 पूर्वी) शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे सात व आठ जुलै रोजी मुंबई आझाद मैदान येथील "आर्त हाक आंदोलन" यशस्वीरित्या संपन्न झाले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने शिक्षकांनी उपस्थित राहून पेन्शन करिता सरकारला आर्त हाक दिली. शिक्षण मंत्री दादासो भूसे यांनी चर्चेदरम्यान संघटनेच्या मागण्या बाबत सकारात्मकता दर्शवली.
सेवानिवृत्त बांधव यांना कोणतीही पेन्शन नाही. अंशतः अनुदान प्राप्त कर्मचारी सेवेत असताना दगावला तर त्याच्या कुटुंबीयांना फॅमिली पेन्शन आहे पण जिवीत कर्मचाऱ्यांना नाही ही बाब मंत्र्यांच्या समोर सविस्तर मांडली. १३ ऑगस्ट २०२४ शासन निर्णयाप्रमाणे शिक्षण आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समिती बाबत संघटनेने आक्षेप नोंदवले. मंत्री महोदयांनी समिती संदर्भात अधिकाऱ्यांच्या कडून माहिती घेतली. अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही असे अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले. संघटनेने विचारलेल्या प्रश्नाबाबत अधिकारी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत तथापि शिक्षण मंत्र्यांनी संघटनेला आयुक्त पुणे यांच्यासमोर जुन्या पेन्शन करिता येणाऱ्या आर्थिक अधिभाराबाबत सविस्तर सविस्तर म्हणणे देऊन पाठपुरावा करण्याची सूचना केली व आयुक्तांना फोन करून संघटने बरोबर बैठक आयोजित करण्यास सांगितले.
शिक्षण मंत्र्यांच्या सोबत बैठकीमध्ये राज्याचे अध्यक्ष प्रा. विजय शिरोळकर, सहसचिव सुनील कांबळे, राज्य समन्वयक प्रा. डॉक्टर गोविंद गोडसे, राज्य संपर्क प्रमुख भास्कर देशमुख, काकासाहेब कोल्हे, दत्ता पाटील आदींनी चर्चा केली.
संघटनेने यापूर्वी चार मोठी आंदोलने केली होती पण आठ जुलैचा दिवस पेन्शन पीडित बांधवांच्या जीवनात विजयाच्या दिशेने जाणारा आशेचा किरण ठरला. संघटनेच्या मागण्या बाबत पाच सप्टेंबर पर्यंत निर्णय नाही झाला तर शिक्षकदिनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला.२००५पुर्वी आणि २००५ नंतर नियुक्तांच्यासाठी देखील लढा उभारून पेन्शन टप्प्याटप्प्याने मिळवून देण्याचा प्रयत्न संघटना करणारच असा मानस व्यक्त करून आंदोलनाची सांगता करण्यात आली. आंदोलनास महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना, पुरोगामी शिक्षक संघटनांनी प्रत्यक्ष पाठिंबा व्यक्त केला.
आंदोलनास काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष हर्षवर्धन संकपाळ, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू भालचंद्र मुंगणेकर, माजी शिक्षण मंत्री खासदार वर्षाताई गायकवाड, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, आमदार सत्यजित तांबे, शिक्षक नेते दादा लाड, खंडेराव जगदाळे, राहुल पोवार, सुरेश संकपाळ, बाबा पाटील,आदींनी प्रत्यक्ष भेट देवून पाठिंबा व्यक्त केला. संघटनेच्या यशस्वीतेसाठी प्रा. योगेश्वर निकम, उपाध्यक्ष प्रा.संपत कदम, राजू लहासे, शरद चोडणकर, कोकाटे, कोषाध्यक्ष प्रा.तानाजी शेळके, प्रा. निशिकांत कडू, अजित सावंत, श्रीकांत पाटील, संजय तिबिले आदीनी परिश्रम केले.
शिक्षण मंत्री दादासो भूसे यांना संघटनेच्या विविध मागण्यांचे निवेदन देताना राज्याध्यक्ष प्रा. विजय शिरोळकर, प्रा.डॉक्टर गोविंद गोडसे, भास्कर देशमुख, सुनील कांबळे