कराड : गतवर्षाप्रमाणे आषाढी एकादशी आणि मोहरमचा सण यंदाही एकाच दिवशी आल्यानं हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये धार्मिक आणि सामाजिक सलोख्याचं वातावरण पाहायला मिळालं. कराडमध्ये मुस्लिम बांधवांनी मोहरमचा उपवास हिंदुंची ग्रामदेवता कृष्णाबाई मंदिराच्या परिसरात सोडला, तर पंजे मिरवणुकीवेळी हिंदू बांधवांचा सहभाग दिसून आला.
पुरोगामी सातारा जिल्ह्याला सलोख्याची परंपरा आहे. त्याची उदाहरणं द्यायची म्हटल्यास साताऱ्यात मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त सर्वधर्मीय भाईचारा सभा आयोजित केली जाते. गणेशोत्सवाच्या दरम्यान बकरी ईदचा सण आला तर कुर्बानीचा कार्यक्रम पुढे ढकलला जातो. सातारा जिल्ह्यातील खातगुण येथे दर्गाचा उरूस हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रित साजरा करतात. साताऱ्यातील गुरुवार तालीम संघ येथे कवडी पीराच्या शेजारी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यात हिंदू-मुस्लिम उत्साहाने सहभागी होतात.
कराडमध्ये बऱ्याच वर्षांपूर्वी गणेशोत्सव मिरवणुकीला दंगलीचं गालबोट लागलं होतं. मात्र, त्यानंतर सर्वधर्मीय सलोखा निर्माण झाला आणि तेव्हापासून सर्वच जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. तो सलोखा आजही अखंड आहे. कराड शहराला दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या 'यशवंत' विचारांची शिस्त आणि परंपरा आहे. म्हणूनच कराडमध्ये कृष्णा-कोयनेसारखा सर्वधर्मीयांचाही प्रीतिसंगम पाहायला मिळतो.
---------------------------