कोल्हापूर न्यूज नेटवर्क
माध्यमांमध्ये येत असलेले नवनवे बदल तसेच माध्यम प्रतिनिधींसाठी पुढे येत असलेली विविध आव्हाने स्विकारणे काळाची गरज आहे. आपले अस्तित्व अधिक ठसठशीत करण्यासाठी नव्या बदलांचा अविष्कार सकारात्मपणे स्विकारणे गरजेचे असल्याचा सूर आज कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयात झालेल्या पत्रकारांच्या कार्यशाळेत मान्यवरांनी व्यक्त केला.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोल्हापूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) कार्यालयाच्यावतीने पहिल्या टप्प्यात शासनमान्य यादीवरील दैनिके व साप्ताहिकांचे संपादक, प्रतिनिधींसाठी पत्रकार कार्यशाळा संपन्न झाली. पत्रकारांसाठी असणाऱ्या शासनाच्या योजना व पत्रकारांसाठीच्या सोयी- सुविधांची माहिती देण्यासाठी कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयात पत्रकार कार्यशाळा संपन्न झाली. वेगवेगळ्या पत्रकार संघटनांचे पदाधिकारी तसेच विविध संपादकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यशाळेत विविध विषयांवर चर्चा झाली.
या चर्चेमध्ये माध्यमांमधील बदल स्विकारणे गरजेचे आहे. तसेच नव्या बदलांना स्विकारुन नव्या संधी निर्माण करणे आवश्यक आहे. याबद्दल अनेकांनी एकमत व्यक्त केले. सोबतच पत्रकारांच्या संदर्भातील शासनाच्या विविध योजनांना सक्षमपणे राबविणारा विभाग म्हणून कोल्हापूर विभागाचे महत्व कायम ठेवण्याचे यावेळी मान्यवरांनी बोलून दाखविले.
या कार्यशाळेत अधिस्वीकृतीपत्रिका, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी योजना, उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, आरोग्य विषयक सवलती, वर्गीकृत जाहिरात, दर्शनी जाहिरात याबाबत माहिती देण्यात आली.
कार्यशाळेत राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य ज्येष्ठ पत्रकार विजय जाधव यांनी राज्य अधिस्वीकृती समितीच्या कामकाजाबाबत माहिती दिली. यावेळी अधिस्वीकृती पत्रिकेसाठी अर्ज दाखल करण्यापासून ते राज्य अधिस्वीकृती समितीच्या बैठकीतील अर्जांची वाटचाल स्पष्ट केली. राज्य अधिस्वीकृती समिती पत्रकारांच्या अधिस्वीकृती संदर्भातच नव्हे तर पत्रकारांचा सर्वांगिण विकास, वाढ, प्रशिक्षण, कायद्यांची अंमलबजावणी, योजनांची उपयुक्तता यासाठी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे यांनी राज्य शासनाच्या योजनांसंदर्भात अंमलबजावणी बरोबरच पाठपुराव्याला महत्व आहे, असे स्पष्ट केले. योजनांच्या अंमलबजावणीसाठी त्याचा पाठपुरावा महत्वपूर्ण ठरतो. यासाठी सर्व संघटनांनी समन्वयातून एकमेकांच्या पाठीशी असावे, असे आवाहन त्यांनी केले.
असोसिएशन ऑफ स्मॉल ॲन्ड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडियाचे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष सम्राट सणगर यांनी लहान व मध्यम वृत्तपत्रांना येणाऱ्या अडचणी विशद केल्या. त्यांनी जाहिरात वितरण, जाहिरातीचे दर याबद्दल पत्रकारांच्या अडचणी स्पष्ट केल्या.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कामकाजाबाबत कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक प्रवीण टाके यांनी मार्गदर्शन केले. पत्रकारांच्या सर्व योजनांचा पाठपुरावा करण्याबरोबरच या योजनांची सक्षमपणे अंमलबजावणी करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वृत्त, लेख व खुलासे प्रसिध्दीबाबत माहिती दिली. शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीबाबत उपसंपादक रणजित पवार यांनी माहिती दिली.
कार्यशाळेच्या प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. माहिती उपसंचालक प्रवीण टाके यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेच्या आयोजनाबाबत माहिती देवून यापुढेही पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी केले. आभार रणजित पवार यांनी मानले. कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केलेले व उपमुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी दिवंगत संजय देशमुख यांना या कार्यशाळेत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
कार्यशाळेला ज्येष्ठ संपादक, कार्यकारी संपादक, निवासी संपादक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------------