मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी अखेर पक्षात भाकरी फिरवली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती केली आहे. शरद पवार यांनी आज पक्षाच्या प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत पक्षाच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदाच्या नियुक्तीबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा देखील करण्यात आली. यावेळी पक्षाचे मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील आपल्या भावना मांडल्या. जयंत पाटील यांनी कवितेतून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. त्यांची कविता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला भावूक करणारी अशीच आहे.
कविता.....
मी एक मुख्य सेनापती होतो, सेना अजूनही सज्ज आहे
नव्या युगातही शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार हाच आमचा ध्यास आहे
मी जातो आहे, पण सोडत नाही
एक पाऊल मागे घेतलंय, पण उद्दीष्ट्ये अजूनही ठाम आहे
कालही महाराष्ट्रासाठी होतो, आजही आहे
नाव असेल किंवा नसेल
पण कामातूनच ओळख मिळेल
कारण मी जयंत आहे .
-------------------------