कोल्हापूर न्यूज नेटवर्क
नागरिकांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पुढील महिन्यापासून लोकशाही दिन कार्यक्रमात प्राप्त होणाऱ्या अर्जांची छायांकित प्रत संबंधित विभागाने त्याचदिवशी घेऊन प्रक्रिया सुरु करावी. या अर्जांवर जलद गतीने कार्यवाही करुन अर्ज तात्काळ निकाली काढावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात लोकशाही दिन कार्यक्रम पार पडला. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, मुद्रांक जिल्हाधिकारी बाळासाहेब वाघमोडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, पोलीस उपअधीक्षक अजित टिके तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
सध्या लोकशाही दिन कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी घेण्यात येतो. या कार्यक्रमात प्राप्त झालेले सर्व विभागांचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या करमणूक कर शाखेकडून एकत्र केले जातात. हे अर्ज पुढील कार्यवाहीसाठी 2 प्रकारे संबंधित विभागाकडे पाठवले जातात. अर्ज स्कॅन करुन लोकशाही दिन पोर्टलवर 2 ते 3 दिवसांत अपलोड केले जातात व संबंधित विभागांना मेलवरही पाठवले जातात. त्याचबरोबर मूळ अर्ज टपालाद्वारे त्या कार्यालयाला पाठवण्यात येतात. परंतु यासाठी 5 ते 6 दिवसांचा अवधी लागत होता. यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून लोकशाही दिनी प्राप्त झालेले अर्ज सध्या elokshahikop.in या पोर्टलवर व मेलवर पाठवण्यात येत आहेत. या पोर्टलवर अर्जदाराचा अर्ज व त्यावर संबंधित विभागाने कार्यवाही करुन दिलेले उत्तर दोन्ही अपलोड केले जाते. त्यामुळे अर्जावरील कार्यवाहीची माहिती नागरिकांना होते.
परंतु या प्रक्रियेसाठीही दोन ते तीन दिवसांचा अवधी लागतो. ही प्रक्रिया अधिक गतिमान होण्यासाठी तसेच लोकशाही दिन कार्यक्रमात प्राप्त झालेल्या अर्जांचा आणखी जलद निपटारा होण्यासाठी लोकशाही दिनी प्राप्त झालेल्या त्या त्या विभागांशी संबंधित अर्जांचे छायाचित्र संबंधित विभाग प्रमुखांनी या कार्यक्रमातच काढून घ्यावेत व या अर्जांवर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज झालेल्या लोकशाही दिन कार्यक्रमात दिल्या आहेत. या उपक्रमामुळे नागरिकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लागून त्यांना जलद न्याय मिळू शकेल.
-----------------------