मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू केलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. जरांगे पाटील यांची तब्येत खालावत असल्यामुळे मराठा आंदोलकांमध्ये चिंता वाढली आहे. सरकारने आता तातडीने यावर तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. आज सुट्टीचा दिवस असल्याने आझाद मैदानावर आंदोलकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. मागच्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरू असून, अद्याप सरकारकडून ठोस प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आज सरकार कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केंद्रीय गृहमंत्री हा प्रश्न सोडवू शकतात
भर पावसात मराठा समाज बांधव उपोषणाला बसले आहेत. मुंबईतील अनेक भागात मराठा बांधव आल्याने तो परिसर विस्कळीत झाला आहे. काल इथे देशाचे गृहमंत्री अमित शहा येऊन गेले. त्यांच्याबरोबर भाजपचे सर्व लोक उपस्थित होते. इतका गंभीर प्रश्न मुंबईत सुरू आहे. तो प्रश्न केंद्र सरकारशी निगडीत आहे. तर आमची अपेक्षा होती देशाचे गृहमंत्री तिथे जातील आणि दिलासा देतील. तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील. 370 हटवून काश्मीर प्रश्न जर गृहमंत्री सोडवू शकतात त्यासाठी घटनेत बदल करु शकतात, ते गृहमंत्री मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी घटनेत बदल करु शकतात असे उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने म्हटले आहे.
------------------------

