कोल्हापूर न्यूज नेटवर्क
बाप्पांचे विसर्जन झाले.त्यानंतर नदीत नीट वाहून न गेलेल्या मूर्तींची आणि पूजा साहित्याची विटंबना पाहून कित्येकांच्या पोटात गोळा आला ,डोळ्यातून अश्रुंच्या धारा वाहू लागल्या.मने कासावीस झाली.
"अरेरे,बाप्पा काय ही तुमची अवस्था. ही कसली भक्ती ! ही कसली श्रद्धा ! "
नदीत किंवा वाहत्या पाण्यातच मूर्तीचे विसर्जन करावे असे कांहीं नाही.नदीच्या , तलावाच्या पाण्याचे प्रदूषण होऊ नये म्हणून सध्या अनेक पर्याय ठेवले आहेत.गणेशाला भक्तीने व सन्मानाने घरी आणलात तर तितक्याच सन्मानाने व भक्तीने विसर्जन झाले पाहिजे.नदीत नुसते सोडून देणे,पुलावरून मूर्ती फेकून देणे, जेसिबीने ढकलत नेणे,याला विसर्जन म्हणत नाहीत.
गणेश म्हणजे अविनाशी ,अनंत असे तत्व आहे.उगीच त्याची आद्य दैवत म्हणून पूजा करत नाहीत.त्याला उगीच सुखकर्ता विघ्नहर्ता म्हणत नाहीत.तुमच्या घरी तो येतो तेंव्हा तुम्हीं त्याची किती छान बडदास्त ठेवता.काय ती सुंदर आरास.त्या पणत्या, त्या फुलांच्या माळा,ती रंग रंगोटी,फटाक्यांची आतषबाजी. ते मुकुट.त्यावर चढवलेले सोन्याचांदीचे दागिणे,सुवासिक अत्तराचा दरवळ, आणि खमंग मोदकांचा नैवेद्य .कधि खीर तर कधी पेढे बर्फी असे नाना तऱ्हेचे ताजे ताजे पदार्थ.आरती करून बाप्पाला नुसते दाखवायचे आणि आपणच खायचे.
आणि निरोप देतांना अशी ही विटंबना !
बाप्पा माफ कर तुझ्या या भक्तांना.जाणून बुजून त्यांनी ही विटंबना केली नाही.त्या मागे त्यांची अंधश्रद्धा आहे.देव भक्तीचा भुकेला असतो हे त्यांना कळत नाही.ही केवळ तुझ्या मूर्तींची विटंबना नाही तर त्यांच्या मनातल्या श्रध्दा आणि भक्ती यांची सुध्दा ती विटंबनाच आहे.
मूर्तीचे विसर्जन वाहत्या पाण्यात करावे अशी एक समजूत आहे.ती किती योग्य आहे ? सध्या नद्यांना जागोजागी धरणे असल्याने ते पाणी वाहते असतेच असे नाही.तलावात सुद्धा विसर्जन करतात.अनेक महानगरपालिका ,नगरपरिषदांनी मोठ्या काहिली, खणी,छोटे तलाव अशा व्यवस्था केलेल्या असतात. देवावरची खरी श्रद्धा किंवा भक्ति म्हणजे त्याची अजिबात विटंबना होऊ नये याची काळजी घेणे होय.नदीत काठावर पडलेल्या बाप्पांच्या मुर्त्या पहिल्या की मन विषण्ण होते.
दहा दिवस पूजा करून काय उपयोग ? याचे कारण म्हणजे मनात जळमटा सारखी चिकटलेली अंधश्रद्धा हेच होय.हीच अंधश्रद्धा देवाबद्दल अविश्वास निर्माण करते.देव भावाचा भुकेला असे आपल्या संतांनी सुद्धा सांगितले आहे. ज्ञानोबा,एकनाथ नामदेव तुकाराम , सावता माळी, विठाेबा, जनाबाई,मीराबाई,यांनी कधीही शास्त्रोक्त विधी केला नाही किंवा विधीपूर्वक मूर्तीपूजा केली नाही.त्यांनी श्रद्धायुक्त अंतकरणाने फक्त भक्ती केली.भाव जोपासला. देव त्यांच्या अंगणात येऊन ठेपला.
तेव्हां आता तरी अंधश्रद्धा गाडा आणि तुमच्या आवडत्या बाप्पाचा सन्मान करा.तो निश्चित तुमचाही सन्मान करेल.
जय गणेश
-----------------------------

