राष्ट्रीय 'गोपाळ रत्न' पुरस्काराने नानीबाई चिखलीच्या अरविंद यशवंत पाटील यांचा दिल्लीत सत्कार

Kolhapur news
By -

 

               

      


               



       कोल्हापूर न्यूज नेटवर्क



 केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागातर्फे देण्यात  येणारा 'गोपाळ रत्न' पुरस्कार  नानीबाई चिखली येथील अरविंद यशवंत पाटील यांना देशातील सर्वोत्कृष्ट पशुपालक म्हणून पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार  बुधवार दि. २६ नोव्हेंबरला दूध दिनानिमित्त नवी दिल्लीमध्ये एका शानदार कार्यक्रमात  प्रदान करण्यात आला . अरविंद पाटील यांना पाच लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.केंद्रीय पशुसंवर्धन व दूध व्यवसायमंत्री राजीव रंजन सिंह, राज्यमंत्री एस. पी. सिंह बघेल यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. 

सर्वोत्तम दूध उत्पादकांना केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागातर्फे दुग्ध व्यवसायात भरीव काम करणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार दिला जातो. यंदाच्या (२०२५) पुरस्कारासाठी देशभरातून २०८१ शेतकऱ्यांच्या मधून अरविंद पाटील यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे .

   अरविंद पाटील यांच्याविषयी... 

   अरविंद पाटील यांनी १९९६ मध्ये सुरुवातीला कर्ज काढून पाच गायीपासून मुक्त गोठा सुरू केला होता. आज त्यांच्या गोठ्यात मुरा म्हशी ७०, एच एफ २०, गीर व इतर जातीची ४० अशी १३० च्या वर जनावरे आहेत. आज दररोज प्रति दिन सहाशे लिटरपर्यंत दूध संकलन होते. दहा एकरांमध्ये पौष्टिक चाऱ्याची लागवड केली जाते. बहुतांशी जनावरे घरची केली आहेत. ब्रिडिंगवर सातत्याने काम चालते. मिल्क मशीन, मुक्त गोठा, सायलेज, सोलर पॅनेल या बाबींबरोबर उपपदार्थही तयार केले जातात.

आतापर्यंत त्यांना जिल्हा परिषदेचा आदर्श गोठा पुरस्कार, गोकुळ श्री पाच वेळा पुरस्कार तसेच विविध संस्था, संघटना यांचेकडून मानपत्र देऊन गौरवण्यात आले आहे.

 नानीबाई चिखलीचे नाव देश पातळीवर

    दुग्ध व्यवसायात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी तब्बल ३० वर्षे सातत्याने परिश्रम घेऊन असंख्यांना रोजगाराच्या वाटा उघडणारे नानीबाई चिखलीचे  अरविंद यशवंत पाटील यांना राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2025 जाहीर हाेणे ही  नानीबाई चिखलीकरांसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे.  या यशामागे त्यांची जिद्द, आई- वडील  यशवंत पाटील, भाऊ अमर सह संपूर्ण  कुटुंबाबरोबरच  जनतेचे पाठबळ आणि दशकांच्या कठोर श्रमाच्या कमाईची केंद्र शासनाने दखल घेऊन या पुरस्कारासाठी माझी निवड केली याचे खूप मोठे समाधान आणि आनंद तर आहेच  तसेच या पुरस्कारामुळे नानीबाई चिखलीचे नाव देशपातळीवर कोरले गेले असल्यामुळे मनामध्ये कृतज्ञतेची भावना असल्याचे अरविंद पाटील यांनी सांगितले . 



                
  ---------------------------