महिला शिक्षिकेचा पगार काढण्यासाठी एक लाख रुपयाची लाच घेताना शिक्षणाधिकाऱ्यास रंगेहात पकडले

Kolhapur news
By -

            



       पुणे : विना वेतन काम करणाऱ्या महिला शिक्षिकेला वेतन सुरू करण्यासाठी 'शालार्थ आयडी'ची आवश्यकता होती. मात्र, ते देण्यासाठी एक लाखाची लाच स्वीकारताना शिक्षण उपनिरीक्षकास एसीबीने रंगेहाथ पकडले. लाच स्वीकारणाऱ्या उपनिरीक्षकाचे नाव रावसाहेब भगवान मिरगणे असे आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) त्यांना अटक केली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 


पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब भगवान मिरगणे (वय 57) यांना एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली. शालार्थ आयडी मंजूर करून देण्यासाठी मिरगणे यांनी ही लाच मागितली होती. ही कारवाई त्यांच्या केबिनमध्ये करण्यात आली.


या प्रकरणी एसीबीकडे तक्रार दिलेल्या 56 वर्षीय व्यक्तीची पत्नी सोलापूर जिल्ह्यातील एका माध्यमिक शाळेत 2016 पासून विनावेतन सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. शालार्थ आयडी नसल्यामुळे त्यांचे वेतन रखडले होते. हा आयडी मंजूर झाल्यावरच वेतन सुरू होणार होते.


तक्रारदारांनी 16 जून 2025 रोजी सोलापूरच्या शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव पुणे विभागीय कार्यालयाकडे पाठवला होता. हा प्रस्ताव ई-ऑफिसवर विभागीय उपसंचालकांकडे सादर करून मंजुरी मिळवण्यासाठी शिक्षण उपनिरीक्षक मिरगणे यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची लाच मागितली होती. 17 आणि 21 नोव्हेंबर रोजी झालेल्या पडताळणीत ही मागणी सिद्ध झाली.


अखेर, मिरगणे यांनी त्यांच्या केबिनमध्ये पंचांसमोर एक लाख रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अजीत पाटील व अर्जुन भोसले, तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे एसीबीने केली. 


                   -------------------------------