कोल्हापूर न्यूज नेटवर्क
श्रद्धेचा उत्सव आणि सेवाभावाचा संगम असलेली श्रीक्षेत्र आदामपूर येथील संतश्रेष्ठ बाळुमामा यांची अमावस्या यात्रा सन २०२५ मध्ये एसटी महामंडळासाठी सामाजिक सेवेबरोबरच आर्थिक यशाची सुवर्णरेषा ठरली आहे. जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत एसटीने तब्बल ३ लाख २८ हजार १६२ भाविकांची सुरक्षित वाहतूक करताना ₹ १ कोटी ९० लाख ६६ हजारांचे उत्पन्न मिळवले असून, हा आकडा यात्रेच्या वाढत्या लोकप्रियतेचे जिवंत प्रमाण आहे.
या सेवेसाठी कोल्हापूर विभागाने वर्षभरात ४७० बसेसद्वारे ५,९४८ फेऱ्या राबवत २ लाख ७० हजार ५६९ किलोमीटरचा सुरक्षित प्रवास पूर्ण केला. प्रवाशांच्या गरजांनुसार वेळेवर बस फेऱ्या, इंधनाचा काटेकोर वापर आणि यांत्रिक देखभालीचे शिस्तबद्ध नियोजन यामुळे प्रति किलोमीटर सरासरी ७० रुपयांचे उत्पन्न साध्य झाले.
विशेषतः मार्च, एप्रिल तसेच नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यांत यात्रेकरूंची संख्या लक्षणीय वाढली. सण, सुट्ट्या आणि अनुकूल हवामान यांचा या वाढीस मोठा हातभार लागला.
दर अमावस्येला भरणाऱ्या या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रासह दक्षिण कर्नाटकातूनही भाविक आदामपूर येथे दाखल होतात. त्यामुळे भविष्यात अधिक बसेस, अधिक सुविधा आणि नियोजनबद्ध वेळापत्रकाची गरज असल्याचे एसटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या संदर्भात बोलताना एसटी कोल्हापूर विभागाचे विभाग नियंत्रक अभय देशमुख म्हणाले,“या यात्रेने धार्मिक पर्यटनाला चालना दिली असून ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सार्वजनिक वाहतुकीला नवा आधार मिळाला आहे.”तर परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी गौरवोद्गार काढताना म्हटले,“संतश्रेष्ठ बाळु मामांच्या यात्रेनिमित्त श्रद्धेच्या पायवाटेवर धावणारी लालपरी आज केवळ भाविकांना मंदिरापर्यंत नाही, तर विकासाच्या दिशेने संपूर्ण परिसराला पुढे नेत आहे... आणि हीच या यात्रेची खरी फलश्रुती आहे!"
-----------------------------

