कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जवळजवळ विझलेले विस्तव आहेत.शरद पवार यांचीही तशीच अवस्था आहे.याचे कारण म्हणजे त्यांचे आत्मकेंद्रित राजकारण होय.
सत्ता आपल्या घरातच राहिली पाहिजे.कार्यकर्त्यांचा नुसता हवा तसा वापर करून घ्यायचा.मतांसाठी कोठेही कसलीही तडजोड करण्याची तयारी ठेवायची.दुसऱ्या फळीतील महत्वाकांक्षी कार्यकर्त्यांना फार वर चढू द्यायचे नाही ही या नेत्यांची पहिल्यापासूनची राजनीती आहे. साऱ्या महाराष्ट्राला ती माहिती झाली आहे .म्हणून कार्यकर्ते एकेक करून किंवा बंड करून सोडून जात आहेत.
नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी या नेत्यांना धोबी पछाड सलामी दिली आहे.
आता त्यांचे लक्ष आहे महानगर
पालिकांच्या कडे.ठाकरे बंधूंना जास्त रस आहे मुंबई व नाशिक मनपा मध्ये.
त्यासाठीच त्यांनी या कडक थंडीत राजकीय युतीची शेकोटी पेटवली आहे.बाळासाहेबांचा करिष्मा आणि त्यांच्याच नावामुळे मिळणारी थोडी वांशिक सहानुभूती यांचे पोत त्यांनी वापरायचे ठरवले आहे.मराठीचा मुद्दा,टोल नाके,मुंबई आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा प्रकारच्या काड्या शेकोटीत टाकायला सुरुवात केली आहे.मत चोरी,उमेदवारांची पळवा पळवी वगैरे काठ्या वापरून शेकोटी हलवत ठेवायची असे त्यांचे प्रयत्न आहेत.आदित्य आणि अमित यांना धगाला बोलावले आहे.बाकी सगळे लांब लांब.
हिंदुत्व नावाचा मुद्दा त्यांनी तूर्त खुंटीला टांगून ठेवला आहे.विकासाचे मिशन वगैरे नंतर बघू .
वारे व्वा!
या राजनीतीला तोड नाही .
कोठे बाळासाहेब ठाकरे आणि कोठे त्यांचे हे वंशज.बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीवर कधि बुड टेकले नव्हते. शाल पांघरलेले दोन्ही हात पसरून आत्मियतेने ते मराठी बांधवांना आवाहन करायचे.मुंबईतील दहशतवादी हल्ल्यांना शब्दांच्या निखाऱ्यातून त्यांनी जी उत्तरे दिली होती त्याला तोड नव्हती.त्यांचे बाणेदार इशारे दिल्लीतील लाल किल्ल्याच्या तटांना जाऊन थडकले होते.तिथले सुस्त सरकार खडबडून जागे झाले होते.राज्याच्या सरकारने सुद्धा डोळे चोळले आणि काय केले ?
बाळासाहेबांनाच अटक केली.ते सुटले आणि मुंबईकरांचे हिरो झाले.हिंदुत्वाचा भगवा झेंडासुद्धा त्यांनी आपल्या थरथरत्या हातात घट्ट पकडला होता.
चार जणांच्या टोळक्याकडे त्यातले काय आहे ?
फक्त टोमणे आणि शिव्या.
ज्यांना स्वतःच्या पक्षाचे कार्यकर्ते टिकवता येत नाहीत ते नेते हताश होऊन विरोधी गटांवर टीका करत राहतात.शिव्या देत राहतात.
मुंबईकर खुप हुशार झालेत.जागृत झालेत.तेच कशाला देशभर राष्ट्रीय भावनेची एक लाट तयार झाली आहे.घराणेशाहीची जनतेला उबग आली आहे. बिहार मध्ये त्याचा प्रत्यय आला.केरळ मध्ये आणि आता कर्नाटकातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात सुध्दा ही आभा फाकलेली दिसून येते.स्वच्छ कारभार,सर्वांचा विकास आणि राष्ट्र प्रथम यांची उन्हे वर येण्याची वाट जनता पहात राहील.धुरकट शेकोटी ऐवजी या उन्हात बसायलाच जनतेला अधिक आवडेल. असेच चित्र मनपा निवडणुकीत पाहायला मिळेल असे दिसते.
----------------

