काेल्हापूर न्यूज / वि रा भाेसले
या लेखाचे शीर्षक सद्यस्थितीत थोडं वेगळं वाटेल.हे जनतेतून आलेले कांहीं ओहळ एकत्र येऊनच तयार झालेला हा मतप्रवाह आहे.मुळात कागल तालुक्यात सदाशिवराव मंडलिक व विक्रमसिंह घाटगे यांचे दोन प्रभावी गट होते.त्यातील मंडलिक गटाचे उत्तराधिकारी म्हणून माजी खासदार संजय मंडलिक हे कार्य करतात.मंत्री हसन मुश्रीफ पूर्वी मंडलिक गटाचे प्रमुख होते.केडीसी अध्यक्ष पदाच्या निवडीवरून हा गट फुटला व मुश्रीफ यांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केला.कागलच्या विकासात स्व.सदाशिवराव मंडलिक आणि त्यानंतर मुश्रीफ या दोघांचाही वाटा आहे.
स्व. मंडलिक यांनी काळम्मावाडी धरणाचे काम पूर्ण करून दूधगंगा व वेदगंगा या नद्यांना कॅनॉलने जोडले तेंव्हा कागलची शेती समृद्ध झाली.मंडलिक यांनी हे जे काम केले आहे त्याला तोड नाही.हमीदवाडा येथील साखर कारखाना काढण्यात स्व.मंडलिक व मुश्रीफ या दोघांनी मिळून काम केले होते.सदा हसन जोडीचा डंका अनेक दिवस वाजत राहिला.केडीसी तील दुफळी नंतर मुश्रीफ यांनी या कारखान्यावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला.त्यात त्यांना यश आले नाही .त्यांनी स्वतःचा वेगळा खाजगी स्वरूपाचा कारखाना कापशी खोऱ्यात काढला.मुश्रीफांची राजकीय वाटचाल ही स्व.मंडलिक यांच्याच प्रेरणेने आणि सहकार्याने शिगेला पोचली यात वादच नाही.राजकारणात कोण कोणाचा मित्र नसतो आणि कोण कोणाचा शत्रू नसतो हे बहुदा कागल च्याच नेत्यांनी शिकविले असावे.मुश्रीफ यांनी त्यानंतर विकास पुरुष म्हणून नाव मिळवले यातही कांहीं शंका नाही.श्रावण बाळ महा डॉक्टर अशा उपाध्या त्यांना लागल्या.विकास निधी आणण्यात त्यांचा महाराष्ट्रात वरचा क्रमांक आहे.यातही वाद नाही.आता थोडा वर्तमान राजकीय घडामोडींचा आढावा घेऊ. माजी खासदार संजय मंडलिक यांनी सुद्धा ना.मुश्रीफ यांना मोठे करण्यात मोठा वाटा उचलला आहे. "तुम्हीं खासदार मी आमदार "या मुश्रीफांच्या हाकेला त्यांनी प्रतिसाद दिला आहे.मुश्रीफांनी गरुड झेप घेतली असेल तर त्यांच्या पंखात बळ भरण्याचे काम मंडलिक गटाने केले आहे.पूर्वाश्रमीचे या गटाचे कार्यकर्ते घेऊनच मुश्रीफ मोठे झाले.मंत्री झाले. समरजितसिंह आज आले.काल पर्यंत ते मुश्रीफांच्या विरोधात होते.नव्वद हजार मते घेऊन त्यांनी मुश्रीफांना घाम फोडला होता.अगदी अल्पावधीत शाहू ग्रुप ने बाहुबली मुश्रीफांना मतांसाठी हत्तीवरून पायउतार व्हायला लावले होते.मतदारांसमोर हात जोडत आवाहन करण्याची वेळ आली होती.विकासाचे वाद्य वाजेनासे झाले तेव्हा सगळे विसरून मंडलिक आणि प्रवीण पाटील गटाने कागल तालुक्यात हलगी हाती घेतली होती आणि मुश्रीफ यांना आमदार व नामदार होण्यास बळ दिले होते.
राजकारणात प्रत्येकाला महत्वाकांक्षा असतेच.आपल्यानंतर आपले रक्ताचे वारसदार गादीवर आले पाहिजेत असे वाटतअसतेच.कार्यकर्त्यांनी कितीही सतरंज्या उचलल्या तरी त्यांच्या कडे निवडून येण्याची कुवत व करिष्मा असतोच असे नाही. तेव्हां साहेबांच्या मागेच जाणे त्यांना भाग पडते.गोकुळच्या राजकारणात हे चित्र पहायला मिळाले.गोकुळचे अध्यक्षपद घरातच राहावे म्हणून केलेल्या तडजोडी जनतेच्या नजरेतून सुटल्या नाहीत. त्यातून मध्येच आल्या नगरपरिषदांच्या निवडणुका. कट्टर विरोधक एकत्र येऊन ही फारसा प्रभाव पडला नाही.कागल हे पूर्वी पासून घाटगे मुश्रीफांचेच होते.मुरगूड जिंकता आले नाही.गडहिंग्लज जिंकले तरी तेथे युतींचाच विरोध झेलावा लागला.आजरा दूर राहिले. हे असं कुठवर चालणार ? निरपेक्ष वृत्तीने आणि राजकीय निष्ठेला साद घालत मुश्रीफ यांनी वाटचाल ठेवली तर तेही एकदिवस महाराष्ट्राचे मोदी होऊ शकले असते.
संजय मंडलिक हे मुरगूडचा टायगर असले तरी मुश्रीफ हे कागलचा लायन आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.जंगलचा सिंह आपल्या दमदार चालीत वारंवार मागे वळून पाहत असतो.त्याला सिंहावलोकन म्हणतात.ना.मुश्रीफ यांनी सुद्धा सिंहावलोकन करावे.विकासाच्या नावावर खेड्यापाड्यातल्या कांहीं मंदिरांना आणि बुद्ध ग्रहांना निधी दिला आहे. तेथे पत्त्यांचे अड्डे बनले आहेत.तोच निधी जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या पोरांच्यासाठी दिला असता तर ती पोरं इवल्याशा हातांनी टाळ्या वाजवत गोड हसलीही असती. विकास हे मतांचे साधन नसावे सामन्यांसाठी ते साध्य हवे.म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही.कागलच्या विकासासाठी मंडलिक मुश्रीफ गटांनी सबुरीने घ्यायला हवे असे जनतेला वाटते.
-------------------------

