कोल्हापूर न्यूज नेटवर्क
नवीन वर्षाची सुरुवात भक्तिभावाने आणि सुखकर प्रवासाने व्हावी यासाठी एसटी महामंडळाने भाविकांसाठी एक आनंददायी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. येत्या मंगळवारी, ६ जानेवारी रोजी येणाऱ्या वर्षातील पहिल्या अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे जाणाऱ्या भाविकांसाठी गारगोटी व मुरगुड बसस्थानकातून थेट एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
ही विशेष बससेवा भाविकांच्या सोयीसाठी आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध असून शासनाच्या धोरणानुसार महिला व ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत, तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे.
सदर बसेस मंगळवारी सकाळी ७ वाजता गारगोटीहून आणि ८ वाजता मुरगुडहून रवाना होऊन कोल्हापूर, मलकापूर, निवळी फाटा मार्गे दुपारी १ वाजता गणपतीपुळे येथे पोहोचतील. दर्शनानंतर परतीच्या प्रवासासाठी बस त्याच दिवशी दुपारी ३ वाजता गणपतीपुळ्याहून निघून रात्री १० वाजता गारगोटी व मुरगुड येथे परत येईल.
भाविकांनी आपल्या प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी MSRTC Bus Reservation ॲप किंवा एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावरून आगाऊ तिकीट आरक्षित करावे, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.
भक्ती, सुविधा आणि सुरक्षिततेचा संगम असलेली ही लालपरी सेवा भाविकांच्या अंगी आनंद आणि मनात समाधान निर्माण करणारी ठरणार आहे. असा विश्वास गारगोटी आगार व्यवस्थापक अनिकेत चौगले यांनी व्यक्त केला आहे.
-------------------------

