कोल्हापूर न्यूज नेटवर्क
नानीबाई चिखलीतील कुमार विद्या मंदिरची क्षेत्रभेट लोकनेते सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना आणि डिलिशिया दूध संघ येथे आयोजित करण्यात आलेली शैक्षणिक क्षेत्रभेट म्हणजे अनुभवाधिष्ठित शिक्षणाचा उत्तम आदर्श ठरली असून, पुस्तकातील धडे प्रत्यक्ष पाहण्याची, समजून घेण्याची आणि अनुभवण्याची संधी या एका दिवसात विद्यार्थ्यांना लाभली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चिखलीचे सरपंच युवराज कुंभार यांनी मोलाची भूमिका बजावली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची, पिण्याच्या शुद्ध पाण्याची तसेच आवश्यक सोयी-सुविधांची त्यांनी उत्कृष्ट व्यवस्था केली. विशेष म्हणजे, ते स्वतः दिवसभर विद्यार्थ्यांबरोबर उपस्थित राहून पालकत्वाची भूमिका निभावत होते.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष काटकर यांनी शाकाहारी व मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या चविष्ट, स्वच्छ आणि दर्जेदार भोजनाची व्यवस्था करून सर्व विद्यार्थी, शिक्षक व पाहुण्यांना तृप्त केले. या लोकसहभागातून उभारलेल्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.
यावेळी कागल तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सौ. सारिका कासोटे तसेच शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक बाळासाहेब निंबाळकर, खडकेवाडा केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख संजय चिखलीकर यांनी उपस्थित राहून अशा प्रकारच्या शैक्षणिक व संस्कारक्षम उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. लोकसहभागातून शाळा आणि समाज यांचे नाते अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले. उत्कृष्ट भोजन व्यवस्थेबद्दल त्यांनी आयोजकांचे विशेष अभिनंदन केले.
दर्जेदार भोजन केल्याबद्दल संदीप शिंदे आणि शिंदे व कांबळे वहिनी यांच्या वतीने आयोजकांचा वृक्षरोप देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच युवराज कुंभार व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष काटकर यांचाही सन्मान करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीचे ग्रामपंचायत सदस्या सौ शोभा चौगुले , दिपाली चौगुले ,नजमा किल्लेदार ,वृषाली पवार , उत्तम सवळेकरी ,अमित शिंदे ,समीर नाईक ,कुमार संकपाळ , शहाजी परमणे यांचे बहुमुल्य सहकार्य लाभले.
साखर कारखान्याच्या क्षेत्रभेटीत विद्यार्थ्यांना ऊस गवणीत टाकण्यापासून ते गाळप, साखर निर्मिती, पॅकिंग आणि गोदामात साठवणूक होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. यंत्रसामग्रीचे कार्य, कामगारांचे कौशल्य आणि उद्योगातील शिस्त यांचा विद्यार्थ्यांवर खोल प्रभाव पडला. ताजी साखर चाखताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले.
यानंतर डिलिशिया दूध संघाला भेट देण्यात आली. येथे दुधापासून पनीर, खावा, आम्रखंड, श्रीखंड यांसारखी उत्पादने कशी तयार होतात तसेच पिशवीतील दूध पॅकिंगची आधुनिक प्रक्रिया विद्यार्थ्यांनी जवळून पाहिली. चिखली गावचे सुपुत्र अमोल कस्तुरे यांनी सर्वांचे सुगंधी दूध देऊन आपुलकीने स्वागत केले.
त्यानंतर कारखाना हॉलमध्ये सर्वांनी एकत्र बसून भोजनाचा मनसोक्त आस्वाद घेतला. बागेतील हिरव्या गवतावर विविध खेळ, गाणी व मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. या आनंदी वातावरणात विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांच्यात सुसंवाद घडून आला.
एकूणच ही क्षेत्रभेट व वनभोजन केवळ सहल न राहता विद्यार्थ्यांसाठी उद्योगजगताची ओळख, सामाजिक सहकार्याचा अनुभव आणि आनंददायी शिक्षणाची आठवण ठरली. शाळा–समाज–प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नातून घडलेला हा उपक्रम निश्चितच इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरेल. मुख्याध्यापक सुरेश ढेकळे, सूर्यकांत पाटील, संजय खुडे , शहनाज सय्यद , ज्योती जिरगे , कौसर पठाण आदींनी संयोजन केले.आभार वृक्षरोपे भेट देऊन नामदेव चौगुले यांनी मानले .
खडकेवाडा केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख संजय चिखलीकर यांचे सहकार्य लाभले.
---------------------------------


