कोल्हापूर न्यूज / वि .रा.भोसले
राम भाऊ सकाळी सकाळी स्कूटर वरून गडबडीने बाहेर जाताना दिसले. गजा भाऊंनी विचारले
अहो रामभाऊ कुठे निघालाय ?
नाट्य महोत्सवाची तिकिटे बुक करायला निघालो आहे.नंतर संपतील ना.
कशाला जाताय आता नाटकाला सगळी थिएटर हाऊसफुल्ल आहेत. मनपा थिएटर तर एकदम जोरात आहे. चार-पाच तिकीट माझ्याकडे आहेत. अरे व्वा ! कोणती ?
या सांगतो.गजाभाऊंनी मोबाईल काढला, आणि हॉल मधील टीव्ही पण लाऊन ठेवला." हा जयंत पाटलांचा पिंजरा .हा चंद्रकांत पाटलांचा नटसम्राट,हा महान दिग्दर्शक बॅरिस्टर ओवेसी यांचा हिजाब,आणि हा मुंबई कर बाहुबली वाल्यांचा पन्नास खोके एकदम ओके. "
जयंत पाटलांचा अभिनय नाना पाटेकर पेक्षा भारी .काय डायलॉग म्हटला आहे.भाजपा म्हणजे पिंजरा पिक्चर मधील मास्तर . काय स्टाईल मध्ये म्हणतात.हा मास्तर सगळ्या गावाचा आदर्श होता .तमाशातल्या नर्तिकेच्या नादी लागला आणि तुंणतुण वाजवायला शिकला.डायलॉगला काय टाळ्या आणि शिट्ट्या म्हणतोस. दुसरं कोणतं ?
दुसरं नटसम्राट .
चंद्रकांत पाटील यांचा अभिनय लाजवाब.डॉ.श्रीराम लागू सुद्धा झक मारतील.मला कोणी पक्ष देता का पक्ष असे ते जयंत पाटलांना उद्देशून म्हणाले. काय टाळ्या वाजवल्या प्रेक्षकांनी.बाल्कनीत तर प्रेक्षक उभे राहून वन्स मोर,वन्स मोर म्हणू लागले.मुंबईत तर जणू बाहुबली आणि बल्लाळदेव पडद्यावरून उडी मारून रंग मंचावर आले.कमळ वाले धनुष्य बाणाच्या दिशेने हात करत ओरडले.पन्नास खोके एकदम ओके. आई शपथ. हे एकदम नवीन नाटक दिसतंय.त्या पेक्षा हे बघ.एकदम लेटेस्ट.कोणतं ?
बॅरिस्टर ओवेसी यांचे
हिजाब वाली पी एम बनेगी.
अरेच्चा, हे कोठूनआलं ?
हैदराबादहून आलंय.न्यूयॉर्कचा सीन दाखवलाय. ममदानी मेयर बनला आहे.तशी मुंबईत एक हिजाबवाली मेयर बनेल.पुढे देशाची पी एम बनेल.काय भारी नाटकं आहेत रे.मला दे सगळी तिकिटं.अरे तिकिटं नाहीत. फ्री पास आहेत.घेऊन जा तुला .रोज दोन खेळ आहेत.फक्त १५ जानेवारीपर्यंत आहेत.१६ ला त्यांचा फिनाले आहे.कोण नंबर पटकावतं ते पाहू.रामभाऊ नी स्कुटी लावली आणि मस्त शिट्टी वाजवत घरात गेले.
अशी नाटकं बघायला सुद्धा नशीब लागतं.
ती पण फुक्कट.
----------------------------


