कोल्हापूर न्यूज नेटवर्क
काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये गेलेले समरजित घाटगे पुन्हा 'घरवापसी' करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त जवळपास निश्चित झाला असून, लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात समरजित घाटगे यांचा भाजपमध्ये अधिकृत पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा आहे .
सूत्रांच्या माहितीनुसार , राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावोस दौरा पूर्ण झाल्यानंतर हा प्रवेश घडवून आणला जाईल. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून यासाठी हिरवा कंदील मिळाल्याचे बोलले जात असून, कोल्हापूर जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश भाजपसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, भाजप प्रवेशापूर्वीच समरजित घाटगे यांनी आपली ताकद दाखवण्यासाठी आणि समर्थकांना दिशा देण्यासाठी 8 जानेवारी रोजी कागलमध्ये 'राजे गटाचा' भव्य मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात जिल्हा परिषद निवडणुकांबाबतची भूमिका स्पष्ट केली जाण्याची शक्यता असून, आगामी राजकीय रणनितीवर सविस्तर चर्चा होणार आहे. या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. समरजीत घाटगे या मेळाव्यातून आपल्या समर्थकांना पुढील राजकीय दिशा देतील, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे हा मेळावा म्हणजे भाजप प्रवेशाची नांदी ठरणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
---------------------------

