कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या आगामी फेब्रुवारी-मार्च २०२७ च्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे पडघम आता वाजू लागले आहेत. परीक्षेच्या नियोजनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या 'ऑनलाईन आवेदनपत्र' (Exam Form) भरण्याच्या प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाली आहे. अशी माहिती कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
नियमित शुल्कासह अर्ज सादर करण्याची मुदत केवळ ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंतच असून, त्यानंतर वाढीव(विलंब)शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी आणि शाळा प्रशासनाने शेवटच्या तारखेची वाट न पाहता तातडीने अर्ज प्रक्रिये पूर्ण करावी, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. चालू वर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत अतिविलंबासह अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर कोणतेही स्थितीत परीक्षार्थींना अर्ज सादर करता येणार नाहीत.
कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे वेळापत्रक अतिशय काटेकोरपणे निश्चित केले आहे. बारावीच्या कनिष्ठ महाविद्यालयांसाठी १४ ऑगस्टपासून, तर दहावीच्या माध्यमिक शाळांसाठी ३१ ऑगस्टपासून ऑनलाईन पोर्टल खुले करण्यात आले आहे. नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी ३१ ऑक्टोबर ही अंतिम तारीख असून, ही मुदत कोणत्याही स्थितीत वाढवून दिली जाणार नाही, असे राज्य मंडळांनी स्पष्ट केल्याचे क्षीरसागर यांनी नमूद केले. त्यांनी सर्व शाळा प्रमुखांना व प्राचार्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांचे अर्ज विहित वेळेत भरले जातील, याची वैयक्तिक जबाबदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. ऑनलाइन अर्ज केवळ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या लॉगिनद्वारेच भरता येतात.
ज्यांचा डेटा ऑनलाईन उपलब्ध नाही, त्यांनी काय करावे?
परीक्षेचे अर्ज भरताना प्रामुख्याने 'सरल' (SARAL) प्रणाली आणि 'यूडायस प्लस' (UDISE+) मधील डेटाचा आधार घेतला जात आहे. मात्र, काही प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन प्रणालीत दिसून येत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी मंडळाने स्पष्ट कार्यपद्धती जाहीर केली आहे:
१. एमव्हीसी (MCVC) व आयटीआय (ITI) विद्यार्थी: ज्या व्यवसाय अभ्यासक्रम शाखेतील विद्यार्थ्यांचा डेटा ऑनलाईन उपलब्ध नाही, त्यांनी कोणत्याही गोंधळात न पडता थेट ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे आवश्यक आहे.
२. इतर विद्यार्थी: ज्या विद्यार्थ्यांचा डेटा एफवायजेसी (FYJC) किंवा यूडायस प्लस प्रणालीमध्ये उपलब्ध नाही, अशा विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत संबंधित विभागीय मंडळाकडे (उदा. कोल्हापूर, कोकण इ.) समक्ष जाऊन आपली कागदपत्रे सादर करावीत. त्यानंतर विभागीय मंडळाकडून आवश्यक ती पूर्तता करून घेऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.
३. पुनर्परिक्षार्थी व खाजगी विद्यार्थी: ज्या पुनर्परिक्षार्थी (Repeaters), नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त खाजगी विद्यार्थी (Private Candidates) आणि श्रेणीसुधार योजनेखालील विद्यार्थ्यांचा डेटा ऑनलाईन उपलब्ध नाही, त्यांना प्रचलित पद्धतीने ऑनलाईन पोर्टलवरून अर्ज भरणे बंधनकारक आहे.
विलंब आणि अति-विलंब शुल्काबाबत -
नियमित कालावधीत अर्ज न भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाकडून विलंब शुल्क आकारले जाते. १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत अर्ज भरल्यास विलंब शुल्क द्यावे लागेल. त्यानंतर १६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत 'अति-विलंब' शुल्कासह (प्रति विद्यार्थी, प्रति दिन ५० रुपये) अर्ज भरण्याची अंतिम संधी असेल. ३० नोव्हेंबरनंतर पोर्टल पूर्णपणे बंद होणार असून, त्यानंतर शाळा व महाविद्यालयांना कोणत्याही परिस्थितीत अर्ज भरता येणार नाहीत.
तांत्रिक पडताळणी आणि खबरदारी-
शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे की, अर्ज भरल्यानंतर शाळांनी 'प्री-लिस्ट' (Pre-list) काढून विद्यार्थ्यांच्या नावातील स्पेलिंग, जन्मतारीख आणि विषय यांची जनरल रजिस्टरशी पडताळणी करावी. प्री-लिस्टवर विद्यार्थी व पालकांची स्वाक्षरी घेणे अनिवार्य आहे. तसेच, फोटो अपलोड करताना तो व्यावसायिकरीत्या काढलेला आणि २५ ते ४० केबी या मर्यादेतच असावा. शुल्क भरताना केवळ भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) ऑनलाईन पेमेंट गेटवेचाच वापर करावा,रक्कम चलनाने भरावी. मंडळात रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही.
परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये:
* नियमित अर्जांची अंतिम मुदत:३१ ऑक्टोबर २०२६ (ही मुदत कडकपणे पाळली जाणार आहे).
* अर्ज सुरू झाल्याच्या तारखा: बारावीसाठी १४ ऑगस्ट, तर दहावीसाठी ३१ ऑगस्ट २०२६ पासून प्रक्रिया सुरू.
* विलंब शुल्क कालावधी: १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२६.
* अति-विलंब शुल्क कालावधी: १६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ (प्रति दिन ५० रुपये ).
* विभागीय मंडळाकडे कागदपत्रे जमा करण्याची तारीख:७ डिसेंबर २०२६ पर्यंत सर्व प्री-लिस्ट व शुल्क चलनासह अहवाल जमा करणे अनिवार्य.
* ऑनलाईन डेटा नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी:अशा विद्यार्थ्यांनी थेट विभागीय मंडळाशी संपर्क साधून आपली माहिती अद्ययावत करून घ्यावी.
* पेमेंट पद्धत: केवळ SBI ऑनलाईन पेमेंट गेटवेचा वापर अनिवार्य; रक्कम चलनाने भरावी. रोख रक्कम स्वीकारण्यास सक्त मनाई.
* फोटो निकष:रंगीत पासपोर्ट फोटो, स्पष्ट चेहरा, पांढरा पार्श्वभाग आणि फाईलचा आकार २५ ते ४० केबी दरम्यान असावा.
* शाळा प्रमुखांची जबाबदारी: विद्यार्थ्यांच्या नावातील चुका टाळण्यासाठी अर्ज भरल्यानंतर प्री-लिस्टवर पालकांची स्वाक्षरी घेणे व प्राचार्य/ मुख्याध्यापकांचा शिक्का मारणे आवश्यक.
याबाबत आवश्यक त्या सर्व सूचना कोल्हापूर विभागीय सचिव अनुराधा म्हेत्रे आणि कोकण विभागीय सचिव पुनिता गुरव यांनी दिल्या आहेत.
य -----------------------------

