कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले
महायुतीने मनपाची दुसरी इनिंग पण जिंकली आहे. एकनाथ शिंदेची शिवसेना महाराष्ट्रात सगळीकडे जोमात आहे.मुबंई, परभणी सोडली तर उद्धवजींची सेना सगळीकडे कोमात गेली आहे. शिंदे शिवसेनेचा आत्मविश्वास जसा वाढला आहे तशी नेत्यांची महापौर पदासाठीची बार्गेनींग पॉवर सुद्धा वाढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस ला गेल्याची संधी साधून एकनाथ शिंदे यांनी आपले एकोणतीस नगरसेवस्क पंच तारांकित हॉटेल मध्ये नेऊन ठेवले. मुबंईचे महापौर पद अडीच वर्षे शिवसेनेला मिळावे अशी मागणी त्यांनी लावून धरली.याला पॉलिटिकलं बार्गेनिंग असे म्हणतात. एकनाथजींचा हा पवित्रा महारष्ट्राच्या जनतेला रुचला नसावा.
देवेंद्र फडणवीस यांच्या झंजावाती प्रचार मोहिमे चा महायुतीला खुप मोठा लाभ झाला होता. अर्थात शिवसेनेला सुद्धा झाला होता. मग हे हॉटेल मॅनेजमेंट कशासाठी. दिल्लीने कान टोचले आणि एकनाथजींनी एकदम सावध पवित्रा घेतला.एकनाथजींच्या नेतृत्वाचा थोडा आढावा घेऊ.एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिले आहेत. कोरोनानंतर राज्याचा कारभार सांभाळत असताना त्यांनी आपल्या समाजाभिमुख कामाची झलक दाखवली.बांधावरचा गडी, लाडका भाऊ, संकटग्रस्तांच्या मदतीसाठी डोंगर सुद्धा चढणारा संकट मोचक, अशी विविध रूपे त्यांनी आपल्या नेतृत्वातून साकारली आहेत. भारतीय जनता पक्षाबरोबर युती केल्याने त्यांना महाराष्ट्रात भरघोस प्रतिसाद सुद्धा मिळाला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या एकाधिकरशाहीतून मुक्त झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात शिवसेनेची स्वतंत्र ओळख करून दिली आहे.एवढं मोठं यश मिळण्याची कारणे सुद्धा पाहूया.पहिले कारण म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांवरची त्यांची श्रद्धा.आनंद दिघे यांना गुरुस्थानी मानून त्यांच्या कार्यावर आधारित लाँच केलेले दोन चित्रपट. त्यातून उद्धव ठाकरे यांच्या बद्दल एक निष्क्रिय नेता म्हणून महाराष्ट्रभर निर्माण केलेली प्रतिमा या गोष्टी त्यांच्या नेतृत्वाला उभारी देणाऱ्या ठरल्या आहेत.गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड यश मिळविल्या नंतर पुन्हा मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी त्यांनी केलेली दिल्लीपर्यंतची धडपड.त्यांची महत्वाकांक्षा वाढत चालली आहे हे सांगण्यासाठी कोणत्याही राजनीतिज्ञाची गरज नाही.नगर पालिका आणि त्यानंतर आलेल्या महानगर पालिका निवडणुकीत सुद्धा भरघोस यश मिळाल्या नंतर त्यांची राजकीय महात्वाकांक्षा अधिक वाढत चालली आहे असे दिसते.
अडीच वर्षासाठी मुंबईचे महापौरपद मिळवण्याची धडपड हा त्यातीलच एक भाग होय. दिल्ली हुन कान टोचणी झाल्यानंतर त्यांनी बदललेली भूमिका जनतेच्या ही लक्षात आली.चाणक्य नितीच्या डावपेचात ते भारतीय जनता पक्षावर मात करू शकत नाहीत हेही दिसून आले. मिळालेले भरघोस यश सुद्धा भारतीय जनता पक्षाशी युती केल्यामुळेच आहे हे ही ते विसरून गेले होते.मुंबईच्यास महापौर पदाचे गणित चुकले तेंव्हा त्यांनी कल्याण डोंबिवलीची आणखी एक चूक केली.भाजपा शिवसेनेची भक्कम संख्या असताना मनसे ला बरोबर घेण्याची गरज काय होती ? नवी मुंबई महापालिकेसाठी सुद्धा त्यांनी रोड शो केले.. गणेश नाईकांनी तेथे त्यांना मात दिली. ठाण्यात त्यांना निर्विवाद बहुमत आहे. उबाठाला ठाण्यात एका जागेवरच तेथे लोळवले.एवढे असताना आपल्या मित्रपक्षाच्या कुरापती त्यांनी काढायला नको होत्या. एक सूत्र सगळीकडे महायुतीने पाळायला हवे. ज्यांच्या जागा जास्त निवडून आल्या त्यांचा नगराध्यक्ष किंवा महापौर झाला पाहिजे.नो बार्गेनिंग.
येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कीं मुंबईत उबाठा अजून संपलेली नाही. मास्क लावून उद्धवजी मातोश्रीत बसले तरी मुंबईत साठाच्या वर नगरसेवक ते निवडून आणू शकतील. बाळासाहेब ठाकरे नावाची जादू त्यांना तेथे तारणार आहे. एकनाथजीनी बाळासाहेबांचा झेंडा फक्त दिखाव्यासाठी खांद्यावर घेतला आहे हे जर महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आले तर एकनाथजींचा चढता आलेख उलटा यु घेऊ शकेल.तत्वाचे आणि विकासाचे राजकारण या दोन चाकावरच युतीचा रथ दौडत राहिला तरच जनता दुतर्फा उभी राहून हात उंचावून जयजयकार करेल आणि पुष्पवृष्टी सुद्धा करेल. ती आता जागी झालीय.
----------------------------

