कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड नगरपरिषदे समोर शिवछत्रपतींचा आश्वारूढ पुतळा आहे. पुतळ्या समोर देखणी फरसबंदी आणि हिरवळ. रयतेच्या राजाच्या या पावन स्मारकाला शिवतीर्थ असे म्हणतात. राजांच्या चरणी नतमस्तक होऊनच येथील दैनंदिन व्यवहार सुरु करण्याची प्रथा आहे.नगरपरिषदेचा प्रशासकीय कारभार सुद्धा राजांना वंदन करूनच सुरु होतो.
या पावन शिवतीर्था समोरच चाळीसभर खोके धारक आहेत. भाजीवाले, फूलवाले, पानपाट्टी वाले, शीतपेय विक्रेते, दूध विक्रेते, बेकरी वाले, केशकर्तन वाले, पेपर वाले, असे हातावर पोट घेऊन दिवसभर कष्ट करणारे हे खोके धारक खुद्द राजांच्या चरणी शरण गेले आहेत.
"राजे आम्हांला न्याय द्या."
असं नेमकं घडलंय काय?
शिवतीर्था समोरून जाणाऱ्या जवाहर रोडचे नूतनीकरण सुरु करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभाग व राज्य रस्ते प्राधिकरण यांच्या अख्त्यारीत हा रस्ता आहे. रस्त्याच्या बाजूचे खोके हे नगरपरिषदेच्या परवानगीने उभे असून ते कर भरतात. भाडे देतात.रस्त्यासाठी हे खोके बुलडोझरने हलविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. सामान्यतला सामान्य माणूस म्हणूनच या खोके धारकां ची ओळख आहे. त्यांचे पुनर्वसन झालेच पाहिजे. ते जसे करदाते आहेत तसे मतदाते सुद्धा आहेत.
शिवतीर्था वरील प्रत्येक कार्यक्रमात त्यांचेही योगदान असते. कोणी फुले देतो, कोणी फळे आणि श्रीफळ, कोणी अभिषेकासाठी दूध..प्रत्येक समारंभात राजांचा तसेच थोर महात्म्यांचा जयघोष करतांना याच सामान्यांचे हात उंचावत असतात.ते कंठरवाने घोषणा ही देतात.अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांची खोकी काढली जातील. म्हणून हे जन सामान्य आता राजांनाच शरण गेलेत.
"राजे आम्हाला न्याय द्या."
ही समस्या फक्त त्यांचीच नाही. मतदानापूर्वी त्यांना आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधिंशी सुद्धा निगडित आहे. स्थानिक प्रशासनाने सुद्धा यात विना विलंब हस्तक्षेप केला पाहिजे. प्रश्न हातावरच्या पोटाचा आहे.त्यांचे कोठेही पुनर्वसन झालेच पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे.
--------------------------------




