कोल्हापूर न्यूज नेटवर्क
पुस्तकातील शब्द शिकवणे ही शिक्षकाची मर्यादा नसून, शब्दांत दडलेला अर्थ विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणे हीच खरी शिक्षकाची ओळख आहे. ज्या देशात शिक्षकांचा प्रवास ‘शिक्षक’ ते ‘आचार्य’ असा होतो, तो देशच खऱ्या अर्थाने उभा राहतो. मात्र ज्या समाजात शिक्षकांच्या भरतीपेक्षा पोलीसांची अधिक भरती करावी लागते, तो शिक्षणव्यवस्थेचा नैतिक पराभव असतो, असे प्रभावी प्रतिपादन साहित्यिक व पत्रकार संदीप वाकचौरे (पुणे) यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ (कोजिम) यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित ‘कोजिम गौरव व प्रेरणा’ पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठ चे माजी कुलपती डॉ. बी. एम. हिर्डेकर होते. हा सोहळा राम गणेश गडकरी सभागृह येथे उत्साहात संपन्न झाला.
वाकचौरे म्हणाले, शिक्षक हा केवळ नोकरी करणारा कर्मचारी नसून तो असिधारा व्रत स्वीकारलेला साधक आहे. तो वृत्तपत्राच्या पानावर नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या हृदयावर विराजमान होतो. विद्यार्थ्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. देशात शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार जिवंत राहिले पाहिजेत; तेच देशाच्या प्रगतीचे प्राण आहेत.
परीक्षेतील गुणांपेक्षा विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविणे अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगताना त्यांनी उच्चशिक्षित पालकांनी मुलांच्या कल्पनाशक्तीवर बंधने आणू नयेत, असे आवाहन केले. तसेच शिक्षक अवांतर वाचन करेल तो दिवस देशपरिवर्तनाचा आरंभ असेल. शिक्षक ज्ञानपरायण झाला तरच समाजात सकारात्मक बदल घडेल, असेही ते म्हणाले.
यावेळी कोजिमच्या कार्याचा आढावा
प्रास्ताविकात कोजिमचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी संघाच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला. प्रारंभी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.पाहुण्यांचा परिचय विजय सरगर व व्ही.जी.सुतार यांनी करुन दिला.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘कोजिम प्रेरणा’ पुरस्कार
दरवर्षीप्रमाणे मराठी भाषेसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रदान करण्यात येणारे “कोजिम प्रेरणा पुरस्कार” यंदाही जाहीर करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दि.२८ रोजी राम गणेश गडकरी सभागृह, न्यू महाद्वार रोड, कोल्हापूर येथे पार पडला.
यावेळी कोजिम गौरव पुरस्कार वसंत अण्णा बाबर (प्रताप लक्ष्मणराव चौगुले हायस्कूल, खोची)
सुभाष मारुती पाटील (टिक्केवाडी हायस्कूल, भुदरगड) व कोजिम वाचन प्रेरणा पुरस्कार किरण आप्पाजी पाटील (जयसिंगपूर) तसेच
कोजिम प्रेरणा पुरस्कार कोल्हापूर शहर व तालुकानिहाय विजेते करवीर, भुदरगड, आजरा, गडहिंग्लज, चंदगड, कागल, राधानगरी, शिरोळ, इचलकरंजी, पन्हाळा, शाहुवाडी, गगनबावडा, हातकणंगले तसेच इंग्रजी माध्यम विभागातील शिक्षकांना मानपत्र,गौरवचिन्ह व शाल देवून गौरविण्यात आले. या सन्मानामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यक्रमास संघाचे उपाध्यक्ष पंडित पाटील, कार्यवाह विजय सरगर, सचिन यादव, अरुण कुंभार, महिला प्रतिनिधी सोनल गाडेकर,कुरुंदवाडच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा मनीषा डांगे ,बी.एस.कांबळे,पी.डी. पाटील, महावीर पाटील, सागर पाटील, दतात्रय घुगरे, राहुल टिपुगडे,अनवर हुसेन पटेल,काका पाटील,सचिन हावळ,राजू भोरे,जयश्री पिंगळे,निशिगंधा नलवडे सुनीता पाटील उपस्थित होते.स्वागत सोनाली गाडेकर, सूत्रसंचालन सचिन यादव यांनी तर आभार नेताजी डोंगळे यांनी मानले.
---------------------------------------------
सभागृह भावूक
भुदरगड तालुक्यातील टिक्केवाडी हायस्कूलचे कोजिम गौरव पुरस्कार विजेते शिक्षक सुभाष पाटील यांनी मनोगतात आपल्या आईने शिक्षणासाठी घेतलेल्या अपरिमित कष्टांची व तिच्या संस्कारांतून घडलेल्या जीवनमूल्यांची भावूक आठवण सांगितली. “हा पुरस्कार माझ्या आईच्या संस्काररुपी जडणघडणीसाठी तिच्या चरणी अर्पण करीत आहे,” असे त्यांनी जाहीर करताच सभागृहातील उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा आनंदाश्रूंनी ओलावल्या आणि वातावरण भारावून गेले.मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित हा सोहळा शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरला असून, शिक्षणक्षेत्रातील मूल्यनिष्ठ कार्याचा गौरव करणारा ठरला आहे.
---------------------------------------
कोल्हापूर: कोजिमचे गौरव व प्रेरणा पुरस्कार विजेते शिक्षकांसोबत साहित्य व पत्रकार संदिप वाकचौरे, डॉ. बी.एम.हिर्डेकर, राजेंद्र पाटील, विजय सरगर, बी.ऐस.कांबळे,मनिषा डांगे.
----------------------



