महिनाभर पायात चप्पल नाही. गोड खायचे नाही.मांसाहार करायचा नाही : मुरगूड मधील दोनशे मुला मुलींनी पाळला बलिदान मास.

Kolhapur news
By -

 

           

     
     


        कोल्हापूर न्यूज नेटवर्क   

         

छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी, देशासाठी दिलेले बलिदान भारत कधिच विसरू शकणार नाही. महाराष्ट्र तर नाहीच नाही. बलिदानाचा हा ओजस्वी इतिहास  यापूर्वी मुलांना फारसा माहीतच नव्हता.तीस चाळीस वर्षांपूर्वीची इतिहासाची पुस्तके पाहिली तर त्यात बाबर, अकबर, शहाजहांन, ओरंगजेब या शहेनशहांचा इतिहास असायचा. पुढे इंग्रज आले. मग पाना पानावर इंग्रजी गव्हर्नर आणि व्हाईसराय यांचे फोटो दिसायचे. लॉर्ड क्लाईव्ह,लॉर्ड डलहौसी ते लॉर्ड माऊंटबॅटन पर्यंत सगळेच रुबबात दिसायचे.


     आज इतिहासाची पानेच बदलली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी , बाजीराव पेशवे, शिंदे, होळकर, राणी लक्ष्मीबाई, राणी चनम्मा, यांचा तेजस्वी इतिहास मुलांसमोर आला.तसा  छत्रपती संभाजी राजांचा रोमहर्षक इतिहास मुलांना माहिती झाला आहे. अवघ्या बत्तीस वर्षाच्या आयुष्यात त्यांनी मोगलांच्या जुलमी राजवटीला घाईला आणले. पाचशेहून अधिक छोट्या मोठया लढाया केल्या. एकही लढायी ते हारले नाहीत. छ शिवाजी राजे सिंह होते तर छ. संभाजी राजे जणू छावा होते.


 राष्ट्रासाठी, धर्मासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. थोरल्या राजांनी  राष्ट्रासाठी कसे जगावे आणि धाकल्या धन्यांनी राष्ट्रासाठी कसे मरावे हे शिकविले.छत्रपती संभाजी राजांना  स्वकीयांनीच दगा फटका केला आणि ते औरंगाजेबाच्या हाती लागले. त्या क्रूरकर्म्याने  मुस्लिम धर्म स्विकारण्यासाठी त्यांचे हाल हाल केले. अनन्वित छळ केला, डोळे काढले, त्वचा सोलली, अनंत यातना दिल्या. हा वीर आहे तरी कसा म्हणून राजांना जवळून पाहाण्यासाठी औरंगजेब आपल्या  आसनावरून खाली उतरला. तेंव्हा राजांच्या समवेत स्वतःचे बलिदान देणाऱ्या कवी कुलेश ने दोन पंक्ती तेथेच रचल्या.


"राजन हो तुम सांचे, खुब लडे तुम जंग. तुव तप तेज निहार के तखत त्यज्यत औरंग."चाळीस दिवस राजे मृत्यूशी झुंज देत होते. त्यांच्या या बलिदानाची स्मृती जागविण्याकरता महाराष्ट्रात बलिदान मास पाळला जातो.लहान मुले सुद्धा यात सामील होतात.मुरगूड मध्ये दोनशे मुलामुलींनी बलिदान मास पाळला आहे. या महिन्यात गोड खायचे नाही, मांसाहार करायचा नाही, पायात चप्पल सुद्धा घालायचे नाही. ही मुले मुली शाळेत सुद्धा अनवाणी जातात.  मैदानातल्या तापलेल्या मातीचे चटके सहन करतात, मनोमन राजांचा जप करतात.  चिमुकल्यांची  ही घोर तपस्या पाहून  शिक्षक सुद्धा भारावून जातात. मायेचा हात त्यांच्या पाठीवरून फिरवतात. मनोमन धाक्यल्या राजांच्या बलिदानाला सलाम करतात. आई बाबा डोळ्यात पाणी आणून त्यांना ह्रदयाशी कवटाळतात.सारेच 

अद्भुत, अकल्पित, मनस्वी.


    धन्य धन्य ते स्वराज्य रक्षक, धर्मरक्षक, मृत्युंजय छत्रपती संभाजी राजे.त्यांच्या तेजस्वी बलिदानाला तोड नाही. जगाला विश्व धर्माची शिकवण देणाऱ्या आपल्या देशात अशी नंररत्ने होऊन गेली म्हणूनच हा देश पारतंत्र्याच्या सर्व शृंखला तोडून तेजानेआणि स्वाभिमानाने आजही उभा आहे.जय जय छत्रपती शंभु राजे.




                 ---------------------