महाराष्ट्राचा सूर हरपला : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन

Kolhapur news
By -

 


                   


        मुंबई : गायिका आशा भोसले यांचे 92 व्या वर्षी निधन झाले आहे. रविवारी दुपारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना शनिवारी संध्याकाळी येथे दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला असून छातीतही काही समस्या असल्याचे वृत्त होते.नंतर त्यांची नात जनाई भोसले यांनी सांगितले होते की त्यांना फक्त थकवा आणि छातीत त्रास आहे. त्या लवकरच बऱ्या होतील.


आशा भोसले यांनी त्यांच्या कारकिर्दीत 12,000 हून अधिक गाणी गायली आहेत. त्यांची "दम मारो दम", "पिया तू अब तो आजा" आणि "चुरा लिया है तुमने" यांसारखी गाणी आजही सदाबहार आहेत. आशा भोसले यांच्यासाठी संगीताचा प्रवास इतका सोपा नव्हता.


आशा भोसले या प्रसिद्ध नाट्यअभिनेते आणि शास्त्रीय गायक दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या आणि महान गायिका लता मंगेशकर यांच्या धाकट्या बहीण आहेत. जेव्हा त्या फक्त 9 वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते, ज्यामुळे त्यांनी बहीण लता मंगेशकर यांच्यासोबत कुटुंबाला आधार देण्यासाठी गायनाला सुरुवात केली होती.


16 वर्षांच्या असताना आशा भोसले यांनी मोठी बहीण लता यांच्या 31 वर्षांच्या सेक्रेटरी गणपतराव भोसले यांच्यासोबत पळून जाऊन लग्न केले होते. लताजी आणि त्यांचे कुटुंब या लग्नाच्या विरोधात होते. यामुळे त्यांनी आशासोबत बराच काळ बोलणे बंद केले होते.


लग्नानंतर आशा भोसले यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आणि त्या घरगुती हिंसाचाराच्या बळीही ठरल्या. त्या आयुष्यात इतक्या निराश झाल्या होत्या की त्यांना स्वतःला संपवायचे होते. 1960 मध्ये त्या पहिल्या पतीपासून वेगळ्या झाल्या.


जेव्हा आशा भोसले यांचे पहिले लग्न तुटले आणि त्या आपल्या तीन मुलांसह (हेमंत, वर्षा आणि आनंद) पुन्हा आपल्या कुटुंबाकडे परतल्या, तेव्हा हळूहळू दुरावा कमी होऊ लागला.


आशा भोसले यांनी संगीतकार आरडी बर्मन यांच्याशी दुसरे लग्न केले होते. त्यांची पहिली भेट 1956 मध्ये झाली होती. त्यांची घट्ट मैत्री आणि संगीताचा प्रवास 'तिसरी मंझिल' (1966) या चित्रपटादरम्यान सुरू झाला. नंतर, एकत्र काम करत असताना त्यांची चांगली मैत्री हळूहळू प्रेमात बदलू लागली 


एक दिवस आरडी बर्मन यांनी संधी साधून आशासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. आशा नी लगेच होकार दिला, पण बर्मनच्या आईने लग्नाला स्पष्ट नकार दिला. त्यांनी बर्मनला सांगितले की, 'हे लग्न होणार असेल तर ते माझ्या मृतदेहावरच होईल.' बर्मनच्या आईने नकार दिला कारण आशा त्यांच्यापेक्षा 6 वर्षांनी मोठ्या होत्या आणि 3 मुलांची आई होत्या.


तेव्हा बर्मनने आईचे म्हणणे शांतपणे ऐकले. मात्र, जेव्हा बर्मनचे वडील एस.डी. बर्मन यांचे निधन झाले, तेव्हा आईची मानसिक स्थिती बिघडली. अशा परिस्थितीत आईच्या तब्येतीत सुधारणा होण्यासाठी बर्मनने 1980 मध्ये आशा भोसले यांच्याशी लग्न केले होते.


आशा भोसले यांनी 50 ते 90 च्या दशकात ओ.पी. नय्यर, आर.डी. बर्मन, खय्याम आणि बप्पी लहरी यांसारख्या अनेक संगीतकारांसोबत काम केले. अनेक सदाबहार गाणी गायली. मात्र, एक वेळ अशीही होती, जेव्हा याच आवाजाला खराब सांगून रेकॉर्डिंग स्टुडिओतून परत पाठवण्यात आले होते.


आरजे अनमोल यांच्यासोबतच्या संभाषणात आशा भोसले यांनी सांगितले होते की, आवाज खराब असल्याचे सांगून त्यांना आणि किशोर कुमार यांना रेकॉर्डिंग स्टुडिओतून बाहेर जाण्यास सांगितले होते.त्यांनी सांगितले होते की, 1947 मध्ये त्या किशोर कुमार यांच्यासोबत जे.बी. रूंगटा यांच्या प्रसिद्ध स्टुडिओमध्ये राज कपूर आणि नर्गिस अभिनीत 'जान पहचान' चित्रपटासाठी गाणे रेकॉर्ड करण्यासाठी गेल्या होत्या. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक खेमचंद प्रकाश होते.


अशोक सराफ यांनी जागावल्या आठवणी


अशोक सराफ म्हणाले,  ही अतिशय वाईट गोष्ट आहे. एकदा त्यांचे रेकॉर्डिंग सुरू होते. मी तिथे गेलो होतो. त्यात 'काय' असे म्हणायचे होते. त्यात त्यांनी मलाच म्हणायला आग्रह केला आणि मी हिम्मत करून तो शब्द त्या लावणीत म्हटला आहे. जसा मी त्यांचा जबरदस्त फॅन होतो तसंच त्या देखील माझ्या फॅन होत्या. त्यांचा स्वर कुठेही पोहोचायचा, वरच्या स्केलवर सहज जायचा.


महेश कोठारेंनी व्यक्त केल्या भावना


महेश कोठारे म्हणाले, फार दुःखद बातमी आहे. त्यांनी पहिल्यांदा मला प्ले बॅक दिले होते. 'तो हा माधव बरवा', हे गाणे त्यांनी गायले होते. मी लहान होतो तेव्हा. त्यांनी माझ्या जिवलगा चित्रपटात गाणे गायले होते, 'जिवलगा राजसा' हे ते गाणे होते. त्यांना आम्ही कधीच विसरू शकत नाही. असे अनेक गाणे होते, जे फक्त त्याच गाऊ शकत होत्या.


       भारताने आजवर अनुभवलेल्या सर्वात प्रतिष्ठित आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसले जी यांच्या निधनाने मला तीव्र दुःख झाले आहे. अनेक दशकांचा त्यांचा असाधारण संगीत प्रवास, आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध करणारा आणि जगभरातील असंख्य लोकांच्या हृदयाला स्पर्श करणारा होता. मग त्या त्यांच्या भावपूर्ण सुरावटी असोत किंवा चैतन्यमय रचना, त्यांच्या आवाजात एक कालातीत तेज होते. त्यांच्यासोबतचे माझे संवाद मी नेहमीच जपून ठेवीन.

त्यांच्या कुटुंबियांना, चाहत्यांना आणि संगीतप्रेमींना माझ्या संवेदना. त्या पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहतील आणि त्यांची गाणी लोकांच्या जीवनात कायम घुमत राहतील.

                 -  पंतप्रधान नरेंद्र मोदी

            


           आज प्रत्येक भारतीयासाठी आणि विशेषतः माझ्यासारख्या संगीतप्रेमींसाठी एक दुःखद दिवस आहे, कारण आपल्या लाडक्या आशा भोसले आता आपल्यात नाहीत.

आशाताईंनी केवळ आपल्या मधुर आवाजाने आणि अतुलनीय प्रतिभेने एक वेगळी ओळख निर्माण केली नाही, तर आपल्या सुमधुर गीतांनी भारतीय संगीताला समृद्धही केले. संगीताच्या प्रत्येक प्रकारात स्वतःला जुळवून घेण्याच्या त्यांच्या अद्वितीय क्षमतेने सर्वांची मने जिंकली. आपल्या आवाजाने लाखो लोकांच्या हृदयाला स्पर्श करत, आशा यांनी हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ आणि गुजराती यांसारख्या अनेक भाषांवर, तसेच लोकगीतांवरही एक अमिट छाप सोडली.

आशाताईंचा आवाज त्यांच्या स्वभावाइतकाच मृदू होता आणि त्यांचा स्वभावही तितकाच साधा आणि मनमिळाऊ होता. जेव्हा कधी आम्ही त्यांना भेटायचो, तेव्हा संगीत आणि कला यांसारख्या विविध विषयांवर आमच्यात खूप गप्पा व्हायच्या. आज त्या आपल्यात नसल्या तरी, त्यांचा आवाज आपल्या हृदयात कायम राहील.

ईश्वर आशांना आपल्या चरणी स्थान देवो. मी त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. ओम शांती शांती शांती.

          - अमित शहा  , केंद्रीय गृहमंत्री



     सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली


देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडियावर देखील आपले दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले, तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणाऱ्या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली.


आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गायनातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई. 'तोरा मन दर्पण कहलाए' अशा भावपूर्ण गाण्यापासून 'खल्लास' पर्यंत अनेक मूडची गाणी लीलया गाणाऱ्या आशाताई भोसले यांनी भक्तिगीत, भावगीत, नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, रवींद्र संगीत, लोकगीते, पॉप असे अनेक संगीत प्रकारांचे गायन करताना त्यावर आपला वेगळा ठसा उमटवला. मराठी, हिंदी, बांगलासह 20 भारतीय भाषा आणि विदेशी भाषांमध्ये 12,000 वर गाणी त्यांनी गायली. 'महाराष्ट्र भूषण' सारखा 'बांगला विभूषण' पुरस्कारही त्यांना  बहाल केला गेला. बदलांना सहजरित्या आत्मसात करणाऱ्या अशा अष्टपैलू गायिका पुन्हा होणे नाही. अलिकडेच जागतिक रेडिओ दिनाच्या कार्यक्रमात आम्ही सोबत होतो, त्यांनी आग्रह करुन 'अभी ना जाओ छोडकर...' हे गाणे माझ्याकडून गाऊन घेतले होते आणि 'पहा मी मुख्यमंत्र्यांना गाणं गायला लावले', असे म्हणाल्याही होत्या, अशा आठवणी फडणवीस यांनी मांडल्या आहेत.


    बंगालने देखील त्यांना बंग विभूषण देऊन त्यांचा सन्मान केला - छगन भुजबळ


छगन भुजबळ म्हणाले, केवळ हिंदी गाणीच नाही तर विदेशातली देखील त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांना दादासाहेब फालके पुरस्कार देखील मिळाला आहे. महाराष्ट्र भूषण देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहेच, पण बंगालने देखील त्यांना बंग विभूषण देऊन त्यांचा सन्मान केला होता. पॉप, भजन, क्लासिकल, चित्रपट गीत असे अनेक गाणी त्यांनी गायली आहेत.


आशा ताईंचे निधन आपल्या सगळ्यांवर आघात- नितीन गडकरी


नितीन गडकरी म्हणाले, आशा ताईंनी अनेक गीत गायली आहेत. त्या सदैव स्मरणात राहणार आहेत. त्यांच्या मृत्यूने आपण अशा गायिकेला मुकलो आहोत, की ज्यांनी आपल्या देशाचे नाव विश्वात प्रसिद्ध केले. त्यांचे हे निधन आपल्या सगळ्यांवर आघात करणारे आहे.


       ------------------------------