कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले
क्रिकेट रसिक हो आता पर्यंत,सुनील गावसकार,सचिन तेंडुलकर,विराट कोहली, कपिल देव, धोनी,यांना खांद्यावर घेऊन नाचलात.रोहित शर्मा, बुमराह यांनाही उचललेत. अनेक क्रिकेट विरांना तुम्हीच हिरो बनवलेत. लोकप्रियतेच्या शिखरावर नेवून बसवलेत.
.
एका अमेरिकन मॅगेझीन ने जगातील लोकप्रिय हीरोंची क्रमवारीच लावली होती. अर्थात ती लोकसंख्येच्या संख्येत मापली जाते. त्यात विराट कोहली एक नंबर ला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुद्धा त्याने त्यावेळी मागे टाकले.
हे प्रेम तुम्ही त्यांना देता याचे कारण ते या देशाला क्रिकेट मधले वैभव प्राप्त करून देतात. त्यांचा जयजयकार करतांना तिरंगा तुमच्या हातात असतो व भारत माता की जय चा जयघोष मुखात असतो.
क्रिकेट, हॉकी, फुटबॉल,कब्बड्डी हे केवळ खेळ नाहीत. त्या खेळात वैभव निर्माण करणारे खेळाडू तुमचे हिरो असतात. त्यांच्या जयजयकारा बरोबर तुम्ही राष्ट्राचा ही जयजयकार करत असता.
एक उदाहरण पुरेसे होईल. दुसऱ्या महा युद्धाच्या सुरुवातीला जर्मनीचा लष्कर शहा अडॉल्फ हिटलर हॉकीचा आंतरराष्ट्रीय सामना पहात होता. भारताचा हॉकी पटू मेजर ध्यानचंद याने सात गोल केले व आपल्या देशाला अजिंक्य पद मिळवून दिले. जर्मन राष्ट्रावर स्वतः पेक्षा सुद्धा अधिक प्रेम करणाऱ्या हिटलरने मेजर ध्यानचंदना फार मोठे आमिष दाखवले आणि विचारले तू जर्मनी च्या टीम मधून जर्मनी साठी खेळायचे. मेजर ने त्यावेळी काढलेले उद्गार फार मोलाचे आहेत.
तो म्हणाला.
"जन्म दात्या माते नंतर भारतमाता ही माझी दुसरी माता आहे.
त्या मातीशी असलेले माझे नाते मी कधीही तोडणार नाही."
आज आपल्या क्रिकेटचे जे हिरो आहेत त्यात एका नवीन हिरोची एंट्री झाली आहे. त्याचे नाव आहे वैभव सूर्यवंशी. पंधरा वर्षाचा हा किशोर ('सोळावं वरीस 'अजुन पूर्ण नाही म्हणून तो युवक नाही.) भारतीय क्रिकेटचा उगवता तारा आहे. ठाकूर शाहिच्या जोखडाने बांधून घातलेक्या बिहार या गरिबांच्या राज्याचा तो प्रतिनिधी आहे. बिहारची प्राचीन राजधानी पाटली पुत्र. सिकंदरला सीमेवरून परत जा म्हणून ठणकावुण सांगणाऱ्या सम्राट चंद्रगुप्त मौर्य आणि गुरु वर्य चाणक्य यांची ही राजधानी. आज तिला पाटणा म्हणतात. श्रीकृष्णाच्या मथुरे वर सोळा वेळा स्वारी करणाऱ्या व प्रत्येक वेळी पराभूत झालेल्या जरा संधाची राजधानी सुद्धा पाटली पुत्र च (आजचे पाटणा शहर )
अशी ऐतिहासिक परंपरा असलेल्या बिहारचे प्रतिनिधित्व क्रिकेटवीर वैभव सुर्यवंशी करत आहे..अव्वल दर्जाचे गोलंदाज बुमराह,हेजलहूड, भुवणेश्वर कुमार, कुणाल पांड्या, हार्दिक पांड्या इत्यादीना त्याने आपल्या फलंदाजीचे लाजबाब कौशल्य दाखवले आहे.
असे हे क्रिकेट पटू कोट्यावधी भारतीय युवक युवतींचे आवडते हिरो आहेत.अर्ध्याहून अधिक लोकसंख्या असलेली ही युवा पिढी आपल्या देशाची लोहशक्ती आहे.ही शक्ती क्रिकेटच्या चुंबकीय आकर्षणात जशी ओढली गेली आहे तशी त्यांच्या हातातल्या तिरंग्याकडे सुद्धा खेचली गेली आहे. म्हणूनच आय पी एल चा कप जेंव्हा रोहितने जिंकून आणला तेंव्हा देशातील शेकडो शहरांच्या चौका चौकात भारत मातेच्या जयजयकाराच्या घोषणा झाल्या. आपल्या महिला संघाने, दिव्यांग महिला संघाने आणि एकोणीस वर्षाखालील संघाने सुद्धा विश्व चषक वाजत गाजत आणले आहेत.
हे क्रिकेट वैभव आपल्या युवा शक्तीला राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देत राहणार आहे. त्यासाठी कोणत्याही राजकीय नेत्यांच्या भाषणांची, प्रसिद्ध वक्त्यांच्या व्याख्यानांची किंवा कुठल्याही कीर्तनकारांची गरज नाही.
फक्त हे क्रिकेटचे हिरो या देशातच राहिले पाहिजेत. चित्रपट अभिनेत्री बरोबर विवाह केलेला विराट कोहली इंग्लंड मध्ये स्थायिक होऊ इच्छित आहे हे मनाला खटकल्या शिवाय रहात नाही. काय कमी आहे आपल्या देशात? कांहीही कमी नाही म्हणून हजारो वर्षे या सुजलाम सुफलाम देशावर सातत्याने आक्रमणे होत राहिली. त्यांनी आपले साम्राज्य उभे केले. या देशाचे तुकडे केले. पण युवकांची अस्मिता ते जिंकू शकले नाहीत. शिवछत्रपतीं सारख्या युग प्रवर्तकांच्या मुळे ती अस्मिता अधिक प्रगल्भ झाली आहे.
युवकांनो क्रिकेट ने दिलेले हे राष्ट्रप्रेमाचे वैभव असेच राष्ट्रासाठी जपून ठेवा.
-----------------------------------

