४० दिवसांपासून सुरू असलेले अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्ध तात्पुरते थांबले आहे.भारतीय वेळेनुसार, 8 एप्रिल रोजी सकाळी 4 वाजता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली की, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्याशी चर्चा केल्यानंतर अमेरिका युद्धविरामासाठी सहमत झाला आहे.
ट्रम्प यांनी लिहिले की, होर्मुझ सामुद्रधुनी त्वरित पूर्णपणे सुरक्षितपणे उघडण्याच्या अटीवर इराणच्या संमतीनंतर पुढील 14 दिवस बॉम्बफेक थांबवण्यासाठी मी तयार आहे.त्यानंतर 40 मिनिटांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनीही दुजोरा दिला की, दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाला आहे आणि चर्चा सुरू आहे.
इराणच्या सरकारी वृत्तवाहिनी IRIB नुसार, इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी सर्व लष्करी युनिट्सना गोळीबार थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
अमेरिका-इराण शस्त्रसंधीचे भारताकडून स्वागत करण्यात आले आहे. शस्त्रसंधीमुळं आखातात आता शांतता राहील, असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच होर्मुझमधली वाहतूक पूर्ववत होईल अशी आशा आहे. आधीच युद्धामुळं खूप नुकसान झालंय. युद्धामुळं जगावर इंधनाचं संकट आलं, असं भारताने म्हटलं आहे. चर्चा आणि कूटनीतीनेच समस्यांवर तोडगा शक्य आहे, असंही भारताने म्हटलं आहे.
ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे, मी दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी इराणवरील बॉम्बहल्ले आणि हल्ले थांबवण्यास सहमत आहे. हा द्विपक्षीय युद्धविराम असेल. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्याशी झालेल्या माझ्या चर्चेनुसार आणि त्यांच्या विनंतीनुसार, मी आज रात्री इराणकडे पाठवण्यात येणारी विनाशकारी लष्करी शक्ती थांबवत आहे, परंतु अट अशी आहे की इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे, तात्काळ आणि सुरक्षितपणे उघडण्यास सहमती दर्शवावी. हे करण्यामागचे कारण असे आहे की, आम्ही सर्व लष्करी उद्दिष्टे आधीच पूर्ण केली आहेत आणि त्याहूनही पुढे गेलो आहोत, आणि आम्ही इराणसोबत दीर्घकालीन शांततेसाठी आणि मध्य-पूर्वेतील शांततेसाठी एका ठोस कराराच्या अगदी जवळ आहोत. मला इराणकडून 10-कलमी प्रस्ताव मिळाला आहे, आणि आमचा विश्वास आहे की वाटाघाटींसाठी हा एक व्यवहार्य आधार आहे.
------------------------------------

