वाढती उष्णताच नव्हे ही तर ओढवून घेतलेली आपत्तीच !

Kolhapur news
By -

 

            


    
             कोल्हापूर न्यूज नेटवर्क

आपल्याला, देशातील सर्वांनाच वाढत्या उष्णतेने सहा बाजूंनी घेरले आहे. आपल्या राज्यातील उष्णतेचा पारा ४५ अंश पार केला आहे तर देशातील काही राज्यांतील तापमान ४८ अंशाहून अधिक आहे. खरं तर ही एक नैसर्गिक आपत्तीच आहे. मात्र आपण सर्वचजण तथाकथित विकासापुढे, विकासाच्या भुल-भुलय्यापुढे पर्यावरण, निसर्गाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो आहे. हे दुर्लक्ष आपल्याला खूप महागात पडणार आहे, यांची जाणीव करून देण्यासाठी हा लेख प्रपंच.


या तीन दिवसात राज्यात उष्णतेचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या जवळपास तापमान आहे. तापमान जरी ४० अंश असले तरी यांची तीव्रता भयंकर आहे. सकाळी ९ वाजल्यापासूनच घाम निथळण्यास सुरूवात होते. मात्र आपण या वाढत्या उष्णतेकडे ग्लोबल वाॅर्मिंगचा परिणाम आहे असा समज करून घेऊन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहोत. 


गेले चार पाच वर्षे आपण बातम्या वाचत आहोत 'यावर्षी उष्णता/उन्हाळा विक्रमी आहे' कोल्हापुरात जरी तापमान ४० अंशापर्यंत पोहोचले असले तरी दहा वर्षापूर्वीच्या उन्हाळ्यात जितके चटके बसत नव्हते, शुष्कता नव्हती तितके चटके , शुष्कता गत पाचेक वर्षापासून  जाणवत आहे. हा उन्हाळा असह्य वाटत आहे. पण या उष्णतेकडे सर्वसामान्य जनता ग्लोबल वाॅर्मिंग अर्थात जागतिक तापमान वाढ- वैश्विक उष्णता आहे, असे समजून किंवा समज करून घेऊन दुर्लक्ष करत आहे. पण ग्लोबल वाॅर्मिंग म्हणजे काय- आपला भाग, आपला परिसर, आपण जे राहतो ते ठिकाण जगाचाच एक भाग आहे. म्हणून आपल्या भागात निर्माण होणारी उष्णता ही ग्लोबल वाॅर्मिंगचाच भाग आहे. याकडे आणि ग्लोबल वाॅर्मिंगला कारणीभूत ठरणाऱ्या दैनंदिन जीवनातील सवयीकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहोत. आपण निसर्गाचे नियम मोडत आहोत, याचेच परिणाम सध्या भोगत आहोत. खरं तर तापमान वाढीची आपत्तीच आपल्यावर आली आहे. पंखा, वाॅटर कुलर, एअर कंडीशन यंत्रणा यामुळे काही जणांना यांची झळ बसत नाही.‌ मात्र दिवसेंदिवस तीव्र होत जाणारी ही आपत्तीच आहे.


पृथ्वी हा उपग्रह प्रचंड उष्णतेचा भला मोठा गोळा होता. कालांतराने या पृथ्वी भोवती वातावरण निर्मिती झाली. प्रचंड पर्जन्य वृष्टी झाली. सजीव निर्मिती, वनस्पती निर्मिती झाली. पृथ्वीवर विविध प्रकारच्या जंगलांची निर्मिती झाली. जैवविविधतेची साखळी तयार झाली. प्राणी, वनस्पतींची निर्मिती झपाट्याने होऊ लागली. 


मात्र हुषार मानव भौतिक सुखासाठी जैवविविधतेच्या साखळीत अडथळे निर्माण करू लागला. जंगलं तोडून तेथे शेती करू लागला. जंगले तोडून तेथे घरं बांधून लागला. जंगले तोडून उद्योग -व्यवसाय, धंदे करू लागला. मानवाने जंगलच नव्हे डोंगर-दऱ्या, नदी, नाले, तलाव, खाड्या येथे अतिक्रमण केले. समुद्रासह पाणवठे प्रदुषित केले. याचा विपरीत परिणाम मानवाच्या भौतिक सुखावर व शाश्वत -निरंतर विकासावर होऊ लागला. 


औद्योगिक क्रांतीची सुरूवात १७६० च्या सुमारास इंग्लंड मध्ये झाली. औद्योगिक क्रांती नंतरच मानवाचा जास्तीत जास्त निसर्गात हस्तक्षेप व्हायला सुरुवात झाली.


 छत्रपती शिवाजी महाराजांनी सुराज्याची निर्मिती करताना निसर्गाचेही संवर्धन केले.


निसर्गात मानवी हस्तक्षेप इतका वाढला की हजारों वर्षांपासून सुरू असलेले ऋतुचक्र बदलू लागले. सध्या ऋतुचक्र इतके बदललं आहे मुलांना आपण ठामपणे सांगू शकत नाही की पाऊस कधी पडतो, थंडी कधी पडते, उन्हाळा केव्हा सुरू होतो. कारण गतवर्षी -२०२५ तर मे पासूनच पाऊसाळा सुरू झाला. हिवाळ्याचे दिवस कमी होऊन उन्हाळ्याचे दिवस वाढले आहेत. ऋतुचक्र बदलांचा परिणाम मानवी आरोग्यासह संजीव सृष्टीवर होत आहे. जसं मानवात वंध्यत्वाची समस्या निर्माण झाली आहे तशीच समस्या पशु-पक्षी, वनस्पती यांच्यामध्येही झाली आहे.


इतकं होत असूनही आपण निसर्गाकडे/पर्यावरणाकडे दुर्लक्ष करत आहोत. निसर्गाला, पर्यावरणाला जराही महत्त्व देत नाही.


उष्णता प्रचंड प्रमाणात वाढत असली तरी आपण उपाय योजना करून आपल्या परिसरातील तीन डिग्री सेल्सिअस इतके तापमान खाली आणू शकतो याचे ठळक उदाहरण म्हणजे कोल्हापूरातील शिवाजी विद्यापीठ व मिरजेतील भारती हाॅस्पीटल होय


      वैयक्तिक करायच्या उपाय योजना


- आपलं घर सध्याच्या काळात दगड मातीचे बांधू शकलो नसलो तरी काॅक्रीटच्या घराला/घरात पीओपी (प्लास्टर), आईलपेंटचा रंग, भडक रंग देऊ नये. भिंतींना बाहेरून, आतून फरशीचे आवरण लावू नये.

 माणसाचा देह जास्तीत जास्त सहा बाय साडेतीन फूट इतक्या आकाराचा असतो. राहण्यासाठी मोठ्या सदनाची आवश्यकता नाही. याऐवजी तीन खोल्या ऐकून सातशे चौरस फूटाच्या पुरेशा आहेत. जास्तीत जास्त क्षेत्र मोकळ्या जमिनीचे ठेवले पाहिजे. 

- घराभोवतीच्या मोकळ्या जागेत हिरवाई फुलवली पाहिजे.

- घरातील सांडपाणी नैसर्गिक पद्धतीने प्रक्रिया करून घराभोवतीच्या हिरवाईत फुलवली पाहिजे. 

-  घराभोवती काॅक्रिटीकरण केले नाही पाहिजे.

- काॅक्रिटीकरण केल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरते नाही याचबरोबर पावसाचे पाणी साचून राहत नाही. 

- रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याची योजना प्रत्येकाने राबविली पाहिजे.

- चालत किंवा स्वयंचलित, सार्वजनिक वाहनांतून प्रवास करणे.


      सार्वजनिक राबवायच्या उपाय योजना


- आपल्या गाव/शहराभोवती बांबू अथवा स्थानिक अथवा जंगली झाडांची लागवड करावी. मोकळ्या जागेत वृक्ष लागवड करावी. ठिक ठिकाणी बगीचा फुलवावा. या हिरवाईला वाया जाणारे पाणी/सांडपाणी सोडावे. 

- सार्वजनिक आणि वैयक्तिक मोकळ्या जागेत पावसाळ्यापुर्वी चर खोदावेत. यामुळे भुगर्भ पाणी पातळी उंचावेल. जमिन तापणार नाही. वृक्षांच्या कडून अधिक बाष्पोश्वास होईल वृक्षछायेसह गारवाही आपल्या परिसरात राहिल.

- कुपनलिका -बोअरवेल खुदाईवर पूर्णपणे बंदी घालावी.  जमिनीतील पाणी वाटेल तसे उपसल्याने जमीन लवकर तापते, भुगर्भ पातळी घटल्याने पाणवठ्यांना पाणी उपलब्ध होत नाही. झाडांना पाणी मिळत नसल्याने बाष्पोश्वासावर मर्यादा येतात.


- स्थानिक स्वराज्य संस्थांनी जलसंवर्धन करून स्वच्छ, शुध्द पुरेसं पाणी नागरिकांना पुरवावे.

- शासनाने व स्थानिक स्वराज्य संस्थांनी‌ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था गतीमान आणि नियमित वेळेत करावी.

- वाहनांच्या ताफा घेऊन प्रवास करणं टाळावं.


सध्या महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा सुरू आहे. पारा ४५ अंशावर गेला आहे. देशातील काही भागात पाऱ्याने अर्धशतक ओलांडले आहे. धुळ्यात आज (२९/४/२०२६) सायंकाळी सहा वाजता ४० अंश तर दिवसा ४३ अंश तापमान होते. देशातील काही राज्यांत तापमानाने ४८ अंशाचा पारा ओलांडला आहे.  पंधरा वीस दिवसांत देशातील २५० जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे एक वृत्त आहे. याला अधिकृत दुजोरा नाही.


        उष्म्याने हाेणारे आजार


डॉ. उमेश दत्त कळेकर यांनी उष्म्याने उद्भावणारे आजार आणि त्यावर उपाय सांगितले आहेत. :


- वाढत्या उष्णतेमुळे आंतर-बाह्या असे परिणाम होतात.

- उष्मा घामाचा त्रास होणे.

- वारंवार तोंड येणे, तोंडात फोड येणे.

- लघवी करताना लघवीच्या ठिकाणी जळजळणे.

- शौचास साफ न होणे.

- मुळव्याध होते.

- डोळे जळजळणे.

- त्वचेवर, डोक्यात पुरळ उठणे.

 - ‌ थंड व जास्त पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावणे 

- वारंवार तहान लागणे.

- पित्त विकार होते.

- उलट्या होणे.

- मळमळणे.

- पाय रखरखणे.

- महिलांना मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव होणे.

-  लहान मुलांना वाऱ्याफोड्या येणे.

- गोवर येणे.

- नागिणी सारखे आजार होणे.

- डोक्यात, त्वचेवर पुरळ उठणे.

- कान दुखणे, कान फुटणे.


     उन्हाळ्यात कोणता आहार घ्यावा


- तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ कमी खावेत.

- पाणीदार फळे, सॅलड- मुळा, काकडी, गाजर, टॅमाटो, कांदा आहारात असावा.

- मोड आलेले कडधान्य व त्यांचे सूप घ्यावे.

- ताक, लिंबू सरबत, चिंचेचा सरबत, पन्हं, सोलकढी कोकम यांचे दुपारी सेवन करावे.


याशिवाय कडक उन्हातून प्रवास करताना संपूर्ण अंग डोक्यासह झाकले जाईल असे फिकट रंगाचे व सैलसर कपडे वापरावेत. 

- गाॅगल वापरावा.

- सलग प्रवास करू नये. तासाभराच्या प्रवासानंतर सावलीत पंधरा वीस मिनिटे विश्रांती घ्यावी. पाणी किंवा देशी शीतपेय प्यावे.


      भारतभूषण केशव गिरी.

      पर्यावरण अभ्यासक.

       कदमवाडी, कोल्हापूर.

 

       *************************