मुंबई: भारताच्या ख्यातनाम सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनानंतर राज्याचे वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आशाताईंसोबतच्या आपल्या काही अत्यंत खास आणि हृद्य आठवणींना उजाळा दिला आहे.
विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले की, सचिन तेंडुलकर याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर पोलीस कल्याण विभागाच्या 'उमंग' या विशेष कार्यक्रमात त्याचा सन्मान करण्याची योजना आखण्यात आली होती. या महान खेळाडूचा सत्कार तेवढ्याच मोठ्या आणि आदरणीय व्यक्तीच्या हस्ते व्हावा, अशी सर्वांची इच्छा होती. म्हणूनच त्यांनी पहिल्यांदा आशाताईंशी संपर्क साधून या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. त्यांनीही कुठलाही आढेवेढे न घेता ते तत्काळ स्वीकारले आणि तो कार्यक्रम खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरला. याच प्रसंगामुळे त्या दोघांमध्ये एक घट्ट आपुलकीचे नाते निर्माण झाले.
या नात्यातील आणखी एक किस्सा सांगताना ते म्हणाले की, ते जेव्हा छत्रपती संभाजीनगर येथे आयजी (IG) या पदावर कार्यरत होते, तेव्हा तिथे आशाताईंचा एक भव्य सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्रीचे दहा वाजले होते आणि प्रेक्षक 'दम मारो दम' या गाण्यावर प्रचंड उत्साहात नाचत होते. प्रेक्षकांकडून वारंवार 'वन्स मोर'ची मागणी होत होती. मात्र, वेळेचे भान ठेवून आशाताई माईकवरून सर्वांना म्हणाल्या की, "माझा भाऊ इथे आयजी आहे, त्याला मला कोणत्याही धर्मसंकटात टाकायचे नाही." असे सांगून त्यांनी तो कार्यक्रम अगदी ठरलेल्या वेळेवर अचूकपणे थांबवला.
आशाताई नेहमीच इतरांच्या मदतीसाठी धावून जायच्या. एका महिन्यापूर्वी त्यांनी लोअर परळ येथील त्यांच्या घरी विश्वास नांगरे पाटील यांना जेवणासाठी बोलावले होते. एका परित्यक्ता आणि गरजू महिलेवर तिचा व्यसनी नवरा अत्याचार करत होता. तिच्या नावावर असलेली एक लहानशी खोली बळकावण्यासाठी तो नवरा तिचे बरे-वाईट करेल, अशी भिती त्या महिलेला वाटत होती. या प्रकरणात केवळ पोलिसांनी कारवाई करावी असेच नाही, तर आशाताईंनी स्वतः पुढाकार घेऊन एका प्रसिद्ध महिला वकिलाला फोन केला. त्या महिलेची घरगुती हिंसाचाराची केस लढण्याची विनंती त्यांनी केली आणि वकिलाची संपूर्ण फी स्वतः भरण्याची तयारी दर्शवली.
त्यांचा शेवटचा फोन गेल्या आठवड्यात आला होता. त्यांच्या घरी काम करणाऱ्या आंध्र प्रदेशातील एका गरीब महिलेच्या घरी मोठी घरफोडी झाली होती आणि तिचे सर्वस्व चोरीला गेले होते. या घटनेची माहिती मिळताच नांगरे पाटील यांनी त्यांच्या एका बॅचमेटला संपर्क साधला. पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून चोराला पकडले आणि चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल परत मिळवून दिला. या कारवाईमुळे अतिशय खुश झालेल्या आशाताईंनी त्यांना पुन्हा एकदा प्रेमाने जेवणाचे आमंत्रण दिले होते. "त्यांच्या हातचे रुचकर चिकन, मटण आणि फिश खाण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असायचो, पण आता मला जेऊ न घालताच त्या अचानक भुर्रर्र उडून गेल्या," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना त्यांनी लिहिले की, आशाताईंचा आवाज विरह, वेदना, प्रणय आणि साफल्य अशा सर्वच भावनांचा अप्रतिम आविष्कार होता. लतादीदींच्या निधनानंतर आता त्यांच्या जाण्याने सांगीतिक विश्व पूर्णपणे पोरके झाले आहे. स्वतःबरोबरच इतरांच्या जीवनातही आनंद फुलवणाऱ्या आणि नावानुसारच नेहमी 'आशावादी' असणाऱ्या आशाताई आता अनंतात विलीन झाल्या आहेत.
-----------------

