मुंबई : " महाराष्ट्रात व्यवसायिक प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक चालकाला व्यवहारिक मराठी येणे अत्यावश्यक आहे. मराठी शिकणे म्हणजे कोणावर बंधन घालणे नव्हे, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि अस्मितेचा आदर करणे आहे,” असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या “वर्धापन दिन व जल्लोष मेळावा” कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी त्यांनी राज्यातील रिक्षा, टॅक्सी, बस आणि ट्रक चालकांच्या योगदानाचा गौरव करत, “व्यवसायिक वाहन चालक हा केवळ चालक नसून महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती देणारा खरा शिल्पकार आहे,” असे सांगितले. वाहतूक क्षेत्र हे समाजाशी थेट जोडलेले असल्याने चालकांचे बोलणे, वर्तन आणि भाषा यावर संपूर्ण व्यवस्थेची प्रतिमा अवलंबून असते, असेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र ही संतांची, विचारवंतांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची भूमी असल्याचे सांगत त्यांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले. “प्रवासी वाहनात बसल्यानंतर त्याला आपल्या भाषेत संवाद साधता आला पाहिजे. ‘नमस्कार’, ‘कुठे जायचे?’, ‘किती भाडे होईल?’ एवढे तरी व्यवहारिक मराठी प्रत्येक चालकाला आले पाहिजे,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
परराज्यातून महाराष्ट्रात येऊन प्रामाणिकपणे काम करणाऱ्या चालकांचे स्वागत करतानाच, स्थानिक भाषा आत्मसात केल्यास प्रवासी, पोलिस आणि प्रशासनाशी संवाद अधिक सुलभ होईल, गैरसमज कमी होतील आणि सेवा अधिक सुसंस्कृत बनेल, असेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
नवभारतीय शिव वाहतूक संघटनेने चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद असल्याचे सांगत, राज्य सरकारच्या माध्यमातून चालकांसाठी विविध कल्याणकारी योजना, प्रशिक्षण उपक्रम आणि व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम राबवले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
“मराठीला विरोध म्हणून पाहू नका; ती आपुलकीची भाषा म्हणून स्वीकारा. ‘मी मराठी, तू मराठी, मराठी आमचा स्वाभिमान’ ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे,” असे आवाहन करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थितांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शेवटी “जय महाराष्ट्र”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
या कार्यक्रमाचे आयोजन हजिअराफत शेख यांनी केले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर यांच्या सह बहुसंख्य रिक्षा व टॅक्सी चालक उपस्थित होते.
---------------------------------

