कोल्हापूर न्यूज नेटवर्क
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मुरगूड ता. कागल येथे दि. 14 मे रोजी अत्यंत उत्साहात साजरी झाली. मुरगूड मध्ये छ.संभाजी महाराजांचे स्मारक व्हावे अशी नागरिकांची मागणी होती.त्यास अनुसरून युवा संघटनांनी एकत्र येऊन येथील जमादार चौकास छ. शिव शंभो चौक असे नाव द्यावे अशी मागणी करून त्या ठिकाणी छ.संभाजी महाराजांच्या प्रतिमेचा भव्य डिजिटल फलक लावला.गुरुवार दिनांक 21मे रोजी नगरपरिषदे च्या सर्वसाधारण सभेत शहरातील अनेक तरुणांनी जमादार चौकास छ. संभाजी महाराज चौक किंवा शिव शंभो चौक असे नाव देण्यात यावे व तसा ऐनवेळेचा ठराव संमत व्हावा अशी मागणी केली. तथापी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून त्यावर निर्णय घेऊ असे सांगण्यात आले.
यावर अनेक युवक एकत्र आले व त्यांनी छ.शिव शंभो च्या घोषणा देऊन तेथेच शुक्रवार दि. 22मे ला मुरगूड बंद ची हाक दिली. शुक्रवारी शहरातून मोटार सायकल मिरवणूक काढून जन जागृती केली. व्यापारी पेठेतील व्यापारी व व्यावसायिक, दुकान दार यांनी बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. युवकांनी शिवतीर्थवार बैठे आंदोलन सुरु करून उपोषणाचा इशारा दिला. चार वाजेपर्यंत निर्णय झाला नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल असे सांगण्यात आले. नगराध्यक्षा सौ. सुहासिनी देवी पाटील व उपनगराध्यक्षा श्रीमती रेखाताई मांगले यांनी युवकांच्या बैठ्या आंदोलनास भेट दिली. दरम्यान मंडलीक गटाचे युवा नेते एडवोकेट वीरेंद्र मंडलिक तेथे उपस्थित झाले.त्यांच्या उपस्थितीत युवकांचे निवेदन स्वीकारण्यात येऊन चौकाला शिव शंभो शासन चौक असे नाव देण्याचे मान्य करण्यात आले. सदरची कार्यवाही 4जून पर्यंत पूर्ण करावी अशी युवक संघटनेने मागणी केली. जर तत्पूर्वी रीतसर मागणी मान्य न झाल्यास 5 जून पासून पुन्हा आंदोलन छेड ण्यात येईल असे सांगण्यात आले.
मागणी मान्य झाल्याने शुक्रवारचे मुरगूड बंद चे आंदोलन मागे घेण्यात आले. अत्यावशक सेवा वगळून पुकारलेले मुरगूड बंद आंदोलन यशस्वी झाल्याबद्दल मिठाई वाटण्यात आली व व्यापारी, पोलीस प्रशासन व नागरिकांचे आभार मनण्यात आले.
दरम्यान जमादार चौकाचे समर्थन करणाऱ्या तेथील स्थानिक नागरिकांनी छ. संभाजी महाराजांच्या स्मारकाला आमचा विरोध नसून बाळासाहेब जमादार चौक हा पूर्वी पासून आहे ते तसेच रहावे व महाराजांचे नाव अन्य चौकास देण्यात यावे असा अर्ज नगरपरिषदेकडे सादर केल्याचे समजले.
आजचा निर्णय गट नेते सुहास खराडे यांनी जाहीर केला. यावेळी मयूर सावर्डेकर, नगरसेवक शिवाजीराव चौगुले, दत्तात्रय मंडलिक, राहुल शिंदे, तसेच विक्रम गोधडे,संभाजी आंगज,विकी साळोखे, अभिजित मिटके, तानाजी डोंगरे, शुभम डेळेकर, सुभाष अनावकर, धीरज सावर्डेकर, सुरज डेळेकर, दिग्विजय चव्हाण, प्रितेश साळोखे,शशिकांत पाटील, राजू दरेकर, बाळू चव्हाण, साई किस्मतगार, विश्वजित रामाने, सिद्धू दिवटे, युवराज सुर्यवंशी असे अनेक युवक उपस्थित होते.
-------------------------

