शिक्षणातून प्रशासनापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास : आर. व्ही. कांबळे यांची कर्तृत्ववान कारकीर्द

Kolhapur news
By -

 


                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी आर. व्ही. कांबळे ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर  आज सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्याविषयी... 


एखादा शिक्षक केवळ विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत नाही, तर समाजाच्या जडणघडणीचेही काम करत असतो. अशाच एका अभ्यासू, प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्त्वाचे नाव म्हणजे आर. व्ही. कांबळे. तब्बल पंधरा वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे पवित्र कार्य पार पाडल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेतून विस्तार अधिकारी पद मिळवून प्रशासन क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली. शिक्षण आणि प्रशासन या दोन्ही क्षेत्रात तब्बल ३५ वर्षांचा समृद्ध अनुभव गाठीशी बांधत ते  सेवानिवृत्त झाले आहेत .


ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावणारे, शिस्तप्रिय आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे शिक्षक म्हणून आर. व्ही. कांबळे यांची सुरुवातीपासूनच ओळख होती. शिक्षक असताना त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश निर्माण केला. त्यांच्या अध्यापनात केवळ पुस्तकी ज्ञान नव्हते, तर जीवनमूल्यांची शिकवणही होती.


आपल्या क्षमतेच्या जोरावर त्यांनी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करत विस्तार अधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारली. प्रशासनातील २० वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, कार्यालयीन शिस्त, लोकाभिमुख निर्णय आणि विकासकामांमधील पारदर्शकता यामुळे विशेष ठसा उमटवला. त्यांच्या कामात प्रामाणिकपणा, संवेदनशीलता आणि जनसामान्यांप्रती असलेली बांधिलकी स्पष्टपणे दिसून येत होती.


     आर व्ही कांबळे यांनी कागल तालुक्यातील बस्तवडे या आपल्या जन्मगावी  प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. उच्चशिक्षित होऊन गोरगरिब मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी ओळखून प्राथमिक शिक्षक म्हणून कागल तालुक्यातील वि.म. म्हाकवे, कुमार विद्यामंदिर चिखली, अशा वेगवेगळ्या शाळांमध्ये ज्ञानार्जनाचे कार्य पंधरा वर्षे अखंडपणे काम केले . एवढ्यावरच नं थांबता 2006 साली सरळ सेवा स्पर्धा परीक्षेतून सर्वसाधारण गटातून सांगली जिल्हा परिषद मध्ये शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली . 


 विस्तार अधिकारी म्हणून त्यांनी पंचायत समिती शिराळा, पंचायत समिती करवीर, माध्यमिक शिक्षण विभाग कोल्हापूर , प्राथमिक शिक्षण विभाग,  कोल्हापूर महापालिकेतील शिक्षण मंडळामध्ये प्रशासन अधिकारी  म्हणून काम केले.  सेवानिवृत्तीपूर्वी ते कोल्हापूर जिल्हा परिषद  येथे विस्ताराधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग असे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. कारण आर. व्ही . हे केवळ अधिकारी नव्हते, तर मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान होते. कनिष्ठ कर्मचाऱ्यांना योग्य दिशा देणे, नागरिकांच्या समस्या शांतपणे ऐकून त्यांचे निराकरण करणे आणि कामात सातत्य ठेवणे ही त्यांची कार्यशैली सर्वांना भावणारी होती. त्यांनी त्यांच्या गावात  बस्तवडे येथे प्रशासक  (सरपंच)  म्हणून ही चांगले काम केले.


त्यांचा जीवनप्रवास हा मेहनत, जिद्द आणि प्रामाणिक सेवाभाव यांचे उत्कृष्ट उदाहरण आहे. प्राथमिक शिक्षकापासून प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.


            ---------------------------











-