कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीतील तीन संचालकांना जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी अपात्र का करू नये अशी नोटिस बजावली आहे. त्या तीन संचालकांना १९ मेपर्यंत म्हणणे मांडण्याची मुदत दिली आहे. त्या तीन संचालकांनी नातेवाईकांच्या नावावर बाजार समितीची ३६०० चौरस फूट इतकी मालमत्ता भाडेतत्वावर घेतली आहे.
बाजार समितीचे संचालक प्रा. शेखर शंकरराव देसाई, सुयोग सुभाष वाडकर आणि भारत बाबासो पाटील भुयेकर यांना नोटिसा लागू केल्या आहेत. बाजार समितीमध्ये संचालक म्हणून काम करताना नातेवाईकांच्या नावावर ३६०० चौरस फूट मालमत्ता भाडेतत्वावर घेतली आहे. यामुळे महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक नियम २०१७ चे नियम क्रमांक दहा (१) नुसार संचालक म्हणून अपात्र करावे अशी तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक करे यांनी बाजार समिती सचिवांना वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर कराव्यात अशा सूचना केल्या होत्या. बाजार समितीकडून जिल्हा उपनिबंधकांना अहवाल सादर झाला आहे.
त्या चौकशी अहवालाच्या आधारे जिल्हा उपनिबंधकांनी, त्या तीन संचालकांना अपात्र का करू नये अशी नोटिस बजावली आहे.यासंदर्भात संबंधित संचालकांनी १९ मे २०२६ रोजी दुपारी तीन वाजता प्रत्यक्षा अथवा त्यांच्या प्रतिनिधीमार्फत खुलासा सादर करावा असे म्हटले आहे. बाजार समितीमध्ये सर्वपक्षीय सत्ता आहे. सगळ्या पक्षाचे संचालक सत्तेत आहेत. दरम्यान नोटिस काढलेल्या या तीन संचालकांपैकी प्रा. शेखर देसाई व भारत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे संचालक आहेत. भारत पाटील यांनी सभापती म्हणूनही काम केले आहे. तर वाडकर हे काँग्रेसचे संचालक आहेत. बाजार समितीच्या तीन संचालकांवर आता कारवाईची टांगती तलवार आहे.
----------------------

