प्रवाशांना वेठीस धरू नका ,15 जून पासून शाळा सुरु होतील. विद्यार्थ्यांची सुद्धा गैर सोय होऊ देऊ नका - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Kolhapur news
By -

 

          


                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


        मुंबई:(१२ जुन) एसटी कर्मचाऱ्यांच्या बहुतेक मागण्या पूर्ण केल्या असून उर्वरित आर्थिक मागणीच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री  यांच्या सोबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. तथापि, कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारू नये, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.


ते शिव-परिवहन कर्मचारी संघटनेच्या वतीने अभिनंदन- सत्कार स्वीकारताना बोलत होते  यावेळी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार आनंदराव अडसूळ व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटीच्या सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे ५६ टक्के महागाई भत्ता करण्यात आला असून यापुढें जेव्हा जेव्हा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा  महागाई भत्ता वाढेल तेव्हा तेव्हा तो एसटी कर्मचाऱ्यांना देखील लागू केला जाईल. त्यामुळे भविष्यात महागाई भत्त्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. याबरोबरच घरभाडे भत्त्यात  देखील वाढ करण्यात येईल त्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्याच्या सूचना मी एसटी महामंडळाला दिलेल्या आहेत. तथापि, उर्वरित आर्थिक मागण्या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार यांच्यासोबत सर्व संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन  निर्णय घेतला जाईल.


  सध्या १५ जून पासून शाळा सुरू होत असून शाळा आणि विद्यार्थी यांच्या दृष्टीने एसटी अत्यंत महत्त्वाचा विषय असतो. त्यांची गैरसोय होऊ नये, तसेच सर्वसामान्य जनतेला देखील प्रवासासाठी वेठीस  धरले जाऊ नये या दृष्टीने कर्मचाऱ्यांनी आंदोलनापासून परावृत्त व्हावे असे आवाहन देखील मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले.


              ----------------------------