हिंदूंचे ध्रुविकरण होत आहे आणि ते झालंच पाहिजे. भगवी टोपी,गोल टोपी आणि पगडी यांनी एकमेकांचा सन्मान ठेवला पाहिजे

Kolhapur news
By -

 

                 


             कोल्हापूर न्यूज / वि.रा. भोसले


         भारत देश हिंदूंचा आहे.हिंदूंचा म्हणजे सकल हिंदवी बांधवांचा आहे.भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने इथल्या प्रत्येक धर्माला, जाती, जमाती आणि पंथ यांना आपापल्या पूजेचे आणि प्रार्थनेचे स्वातंत्र्य दिलेले आहे. तथापी राष्ट्र ध्वज, राष्ट्र गीत आणि राष्ट्रीय एकात्मता यांचा सन्मान राखण्याची  जबाबदारी पण प्रत्येक भारतीयांवर सोपविली आहे.


    डॉ. आंबेडकरांचे एक स्वप्न होते. हा विशाल देश स्वातंत्र्यानंतर खुप खुप विकसित झाला पाहिजे. गुलामगिरीच्या सर्व खुणा पुसून टाकून पुन्हा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे.दुर्दैवाने या देशाला अजुनीही जातीय,पंथीय आणि धार्मिक दुहिला तोंड द्यावे लागत आहे.मुघल आणि इंग्रज हे आक्रमणकारी होते. ते बाहेरच्या देशातून आले होते.पैकी इंग्रज हा देश सोडून निघून गेले. बरेच मुस्लिम या देशात या देशाचे नागरिक म्हणून राहिले. त्यात बहुदा सर्व धर्मांतरित होते.पाकिस्तान आणि बांगलादेश असे या देशाचे दोन तुकडे करून मुस्लिमांनी आपल्या नवीन देशांची स्थापना केली.

 उर्वरित सर्व मुस्लिमाना या देशाने सामावून घेतले.त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे की त्यांनी या मातीशी आणि पाण्याशी आपले इमान ठेवावे.दुर्दैवाने हा समाज परकीय कट्टर पंथीयांच्या आहारी जात आहे असे चित्र दिसू लागले आहे.


   मुळातच सहिष्णू असलेला हिंदू बांधव आता जागा होत आहे.हिंदू धर्माचे ध्रुविकरण होत आहे. इतर धर्म बांधवांना त्यांनी कसलीही इजा केलेली नाही. मात्र पाकिस्तान, बांगलादेश आणि अन्य कांही मुस्लिम देश यांच्याकडून भारतीय मुस्लिमांना विद्रोहाची चेतना मिळत आहे. मुस्लिम बांधवांनी आपण या देशाचे नागरिक आहोत यांची जाण ठेऊन  देशाच्या ध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा सन्मान ठेवला पाहिजे हीच खूण गाठ आता बाळगली पाहिजे.घटनेने प्रार्थनेचे स्वातंत्र्य दिलेले आहे.पूजेचे सुद्धा स्वातंत्र्य दिले आहे.आपापल्या कक्षेमध्ये सर्व धर्मांनी पूजा आणि प्रार्थना करायला हरकत नाही.भगवी टोपी, गोल टोपी आणि पगडी यांनी एकमेकांचा सन्मान ठेऊन या देशाला आत्मीयतेने स्वीकारले पाहिजे. तरच हा एक  देश खुप खुप प्रगती करू शकेल.


   या ठिकाणी मुद्दाम एक उदाहरण द्यावे असे वाटते.चीन हा देश सुद्धा जपानच्या पारतंत्र्यात होता आणि आपल्या नंतर तो स्वतंत्र झाला आहे. स्वतंत्र झाल्यानंतर लगेचच त्यांनी पारतंत्र्याच्या सर्व खुणा पुसून काढल्या. अभ्यासक्रम बदलला जुनी नावे काढून टाकली आणि गुलामगिरीच्या सर्व खुणा सुद्धा पूर्णपणे पुसून टाकल्या. नव्या पिढीला आपण परतंत्र होतो हे माहितीच नाही.आपल्या देशात मात्र तसे नाही. अजूनही बाबर,औरंगजेब हुमायुन यांच्या खुणा जशाच्या तशा आहेत. त्या पुसून टाकल्या पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराज, छ.संभाजी महाराज महाराज,राणा प्रताप हे आपल्या शौर्याची प्रतीके आहेत तर भगवान बुद्ध महावीर स्वामी विवेकानंद राम रामकृष्ण परमहंस हे आपल्या भारतीय धर्म संस्कृतीची प्रतिके आहेत.


    दुर्दैवाने काही सत्ता पिपासू राजकीय नेते हिंदू धर्मामध्ये फूट पाडत आहेत. दलित समाजाला ब्राह्मण समाजाच्या, मराठ्यांना इतर मागास वर्गीयांच्या, मुस्लिमांना देशाच्या विरोधात भडकवत आहेत. शासकीय फंड मात्र त्यांना मिळाले पाहिजेत. इकडे राजकारणी पुढारी जातीपातींना एकमेकांच्या विरोधात उभे करून आपापली सत्तेची पोळी भाजून घेत आहेत.त्यामुळे सकल राष्ट्राची भूमिकाच मागे पडत आहे. वाढती लोकसंख्या, बेरोजगारी, महिला संरक्षण,धर्मांतरण,शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव, महागाई,जवानांची शस्त्र सज्जता, अशा अनेक आव्हानांना आपल्याला तोंड द्यायचे आहे.लांब राहून चीनच्या प्रगतीचे कौतुक करत बसण्याची ही वेळ नाही तर पारतंत्र्याच्या सर्व खुणा पुसून चीन जगात जसा पुढे गेला आहे तसा भारत कसा पुढे जाईल हे  पहाणे महत्वाचे आहे.


  या देशातल्या सर्व धार्मियांनी एकमेकांचा सन्मान ठेवत या राष्ट्रावर प्रेम केले पाहिजे. बहुसंख्य असलेला सकल हिंदू समाज एक झाला पाहिजे. निवडणुकीतील मतपेट्यांसाठी नव्हे तर शक्तिशाली राष्ट्राच्या निर्मितीसाठी साठी. वैभव शाली भारताचे अस्मिता पुन्हा मिळवण्यासाठी.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी.


    त्या दृष्टीने सकल हिंदू धर्माचे ध्रुविकरण (एकत्रिकरण) होणे अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे आहे.ते झालेच पाहिजे.


           ----------------------