कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त मुरगूड आगारात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शालेय विद्यार्थिनींच्या हस्ते एसटी बसचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ प्रवाशांच्या हस्ते वर्धापन दिनाचा केक कापण्यात आला. यावेळी उपस्थितांनी एसटीच्या गौरवशाली परंपरेचा गौरव करत प्रवाशांना सुरक्षित व दर्जेदार सेवा देण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमात ओंकार पोतदार यांनी मनोगत व्यक्त करत एसटी ही ग्रामीण भागातील नागरिकांची जीवनवाहिनी असून विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी महत्त्वाची सेवा असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास व्ही. आर. भोसले, सर्जेराव भाट, प्रशांत शहा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच सहाय्यक वाहतूक नियंत्रक प्रशांत नाईक व वाहतूक नियंत्रक बाबुराव परीट यांच्यासह आगारातील वाहक, चालक, कर्मचारी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वर्धापन दिनानिमित्त आगार परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित मान्यवरांनी एसटीच्या सेवेला शुभेच्छा देत भविष्यातही प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
-------------------------

