कोल्हापूर न्यूज नेटवर्क
धर्मस्थळ ग्रामीण विकास प्रकल्प, निपाणी यांच्यावतीने शेंडूर, गोंदिकुप्पी व शिरगुप्पी येथील ३० शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार वेंगुर्ला ४ व्हरायटीच्या २००० रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी धर्मस्थळ ग्रामीण विकास योजना निपाणीचे प्रकल्प प्रमुख मंजुनाथ, कृषी संशोधन केंद्र, निपाणीचे प्रमुख संजय पाटील व सेवा या स्वयंसेवी संस्थेचे सचिव अशोक तोडकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
यावेळी मंजुनाथ यांनी धर्मस्थळ संस्थेचे कर्नाटक राज्यात स्वसहाय्य संघांच्या माध्यमातून महिलांना संघटित करण्याचे व त्यांना बँकांकडून कर्ज पुरवठा करुन त्यांची आर्थिक उन्नती साधण्याचे काम तसेच शेतकरी, युवक व महिला यांना विविध प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे होत असलेले सक्षमीकरणाचे काम याबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी संजय पाटील यांनी शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांबरोबरच अधिक उत्पन्न देणाऱ्या भात, ज्वारी यासारख्या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्याची गरज असल्याचे सांगितले. सेवा संस्थेच्या माध्यमातून एरंडी व करडई लागवड हाती घेतली असून जंगली जनावरांच्या उपद्रवापासून मुक्तता हवी असेल तर अशा पिकांची लागवड करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. सध्या बाजारामध्ये विषयुक्त धान्ये व भाजीपाला मिळत असून यामुळे जमिनीची उत्पादकता तर कमी होतेच शिवाय हे मानवी जिवनाला देखील हानीकारक आहे म्हणून शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचा अवलंब करणे महत्वाचे असल्याचे सांगितले.
यावेळी बोलतांना अशोक तोडकर यांनी गावातील पिकपध्दती, शेतकरी करीत असलेले विविध प्रयोग याबाबत माहिती दिली. त्याचबरोबर धर्मस्थळ संस्थेचे या भागातील लोकांच्या उन्नतीसाठी होत असलेले काम समाजाभिमुख असून त्याचा लाभ सर्व समाज घटकांनी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच काजू लागवडीसंदर्भात आवश्यक तापमान, पाऊसमान, सुरुवातीची ३ वर्षे उन्हाळ्यात सिंचनाची व्यवस्था, झाडांची घ्यावयाची काळजी व या झाडांपासून मिळणारे उत्पन्न याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन स्वसहाय्य संघाच्या कार्यकर्त्या छाया पाटील (नाईक), छाया शिंदे स्थानिक सहकार्य करणारे राजू नाईक व स्वसहाय्य संघातील महिलांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व व्यवस्थापन धर्मस्थळचे कृषी विस्तार अधिकारी सुरेश हलवार यांनी व आभार पर्यवेक्षक गुरुनाथ यांनी केले. कार्यक्रमासाठी शेंडूर, गोंदिकुप्पी व शिरगुप्पी येथील शेतकरी व महिला बहुसंख्येन उपस्थित होत्या.
सोसायटी फॉर एज्युकेशन वेल्फेअर अँड अक्शन (सेवा) सचिव अशोक तोडकर यांनी आभार मानले .
----------------------


