एकाचवेळी १० सरकारी अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवर धाडी

Kolhapur news
By -

 


          


बंगळुरू: लोकायुक्तांनी बुधवारी राज्यभरात धाडसत्र राबवलं. एकाचवेळी १० सरकारी अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या. या सगळ्या अधिकाऱ्यांकडे त्यांच्या उत्पन्नापेक्षा कैकपट अधिक संपत्ती असल्याचा आरोप आहे.


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरू शहर, बंगळुरू दक्षिण, रायचूर, चित्रदुर्ग, तुमकुरु, शिवमोगा आणि कलबुर्गीत धाडी टाकण्यात आल्या. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. घरांची, कार्यालयांची झडती घेण्यात आली.


लोकायुक्तांनी धाडसत्र सुरू असताना एईओ पुष्पा यांच्या घरात मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आणि रोकड सापडली. या दागिन्यांचं नेमकं मूल्य जाणून घेण्यासाठी सोनाराला बोलावण्यात आलं आहे. कृषी मंत्रालयात अधिकारी असलेल्या पुष्पा भ्रष्टाचारात फायर निघाल्याची चर्चा आहे. त्यांच्याकडे सापडलेल्या दागिन्यांची, रोख रकमेची मोजदाद सुरू आहे. मोजदाद पूर्ण झाल्यावरच त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचं नेमकं मूल्य समजेल.


लोकायुक्तांच्या पथकांनी १० अधिकाऱ्यांशी संबंधित ठिकाणांवर धाडी टाकल्या. यामध्ये कृष्णा भाग्य जल परिषद लिमिटेड रायचूरचे कार्यकारी अभियंते बसनगौड पाटील, कृषी अभियांत्रिकी विद्यापीठ चित्रदुर्गचे सहायक प्राध्यापक शंकर एम आणि वॉटरशेड विकास विभाग चित्रदुर्गचे वनक्षेत्रपाल दुग्गप्पा बी यांचा समावेश आहे.


यासोबतच बंगळुरू सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंते नरेंद्र कुमार, केआरआयडीएल बंगळुरूचे रेंज ऑफिसचे अभियंते प्रवीण बी. श्रीहरी आणि बंगळुरू एपीएमसीच्या उपसंचालिका (प्रशासन) पुष्पा डी. आर. यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे टाकण्यात आले आहेत. पुष्पा यांच्याकडे काळी माया सापडली असून सध्या त्यांच्या संपत्तीची मोजणी सुरू आहे. अधिकाऱ्यांचं पथक त्यांच्या मालमत्तेची मोजदाद करत आहे.


याशिवाय तुमकुरुचे सिंचन विभागाचे सहायक अभियंते मधुसूदन एन. बंगळुरू दक्षिणच्या कुंबलगोडू पंचायतीचे पीडीओ थिम्मे गौडा, शिवगोमा फॉरेस्ट रिसर्च डिव्हिजनचे असिस्टंट कंझर्व्हेटर किरण अंगडी आणि कलबुर्गीच्या जीईएससीओएमचे सहायक कार्यकारी अभियंत्या अमृत राव यांच्याही मालमत्तांवर धाडी पडल्या आहेत. लोकायुक्तांची पथक या सगळ्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीची मोजदाद करत आहेत. अधिकाऱ्यांकडे असलेली संपत्ती त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे का, याचा शोध सुरू आहे.



           --------------------------