कोल्हापूर न्यूज नेटवर्क
नगरपालिकेने सर्वे करून अजूनही किती लोकांना घरांची गरज आहे, याचा अहवाल तयार करावा. मी आणि समरजितसिंह घाटगे मिळून प्रयत्न आणि पाठपुरावा करून पुन्हा नव्याने ३००० घरकुले बांधू. त्यासाठी पाच एकर जागा आरक्षित आहे आणि त्याचा आराखडाही तयार केलेला आहे असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कागल शहरातील वड्डवाडी येथे बेघरांना ७० घरकुले प्रदान कार्यक्रमात ना.हसन मुश्रीफ बोलत होते. राजे समरजीतसिंह घाटगे अध्यक्ष शाहू ग्रुप प्रमुख पाहुणे म्हणून होते.
या कार्यक्रमापूर्वी कागल नगरपालिकेच्या नव्याने बांधलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे 'स्वर्गीय अजितदादा पवार जलशुद्धीकरण केंद्र' असा नामकरण समारंभ झाला.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत फिल्टर हाऊस ते बोटिंग क्लब परिसर व कागल शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपणाचा सोहळा संपन्न झाला. आमदार निधीतून रु. २५ लाख खर्चाच्या ६० सोलर दिव्यांचे उद्घाटन, असे कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
बेघराना मिळालेल्या घरकुलामुळे त्या कुटुंबांचे केवळ एक घर होत नाही. तो परिसर स्वच्छ राहतो, मुलांवर चांगले संस्कार होतात. एकूणच त्या कुटुंबाचे जीवनमान आणि राहणीमानही उंचावते.
प्रतिष्ठापना केलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार येणार आहेत. त्यावेळी न भूतो न भविष्यती असा दिमाखदार कार्यक्रम करण्याचे निश्चित केले.
कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ. सविता प्रताप माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, मुख्याधिकारी अजय पाटणकर,प्रताप ऊर्फ भैय्या माने, प्रकाशराव गाडेकर, चंद्रकांत गवळी, सौरभ पाटील, दीपक मगर, अरुण गुरव, संजय चितारी, अजितसिंह घाटगे, मारुती मदारे, नगरसेविका सारिका बारड, नवाज मुश्रीफ, यांच्यासह सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
स्वागत गटनेते सतीश घाडगे यांनी केले. प्रास्ताविक आरोग्य सभापती प्रवीण काळबर यांनी केले. आभार नगरसेविका सारिका बारड यांनी मानले.
-----------------------


