कोल्हापूर न्यूज नेटवर्क
पुणे येथे महाराष्ट्र राज्यातील २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय समितीची राज्यस्तरीय बैठक बुधवार दि २६ रोजी साधना विद्यालय, हडपसर, पुणे येथे संपन्न झाली.
राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या प्रतिनिधींनी बैठकीत सहभाग घेतला. यापूर्वी जुनी पेन्शन योजनेसाठी अनेक आंदोलने करण्यात आली असूनही शासनाकडून अपेक्षित निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता आंदोलनाची अंतिम दिशा निश्चित करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीत प्रत्येक जिल्ह्याच्या प्रतिनिधींनी आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडली. शासनाला अंतिम संधी देत दि. १ ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत काळ्या फिती लावून शालेय कामकाज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानंतर दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मूक मोर्चा काढून शासनाला निवेदन देण्यात येणार आहे.
तरीही शासनाने दि. २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत ठोस निर्णय घेतला नाही, तर दि. २८ सप्टेंबर २०२६ पासून आझाद मैदान, मुंबई येथे सहकुटुंब आंदोलन व आमरण उपोषण करण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला.
“जुनी पेन्शन लागू करा, अन्यथा इच्छा मरणाची परवानगी द्या,” अशी टोकाची भूमिका घेण्याची वेळ शासनाने कर्मचाऱ्यांवर आणू नये, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
शासनाने राज्यातील २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली आहे. अशी माहिती प्रसिद्धीस कार्याध्यक्ष बाबा पाटील यांनी दिली.
-----------------------------

