मुरगूडमध्ये राखीच्या धाग्यांनी जपली सामाजिक बांधिलकी ! स्वच्छता कर्मचारी भगिनींसोबत अनोखे रक्षाबंधन ; साडी भेट देत केला सन्मान

Kolhapur news
By -

 

          


                     कोल्हापूर न्यूज नेटवर्क



 रक्षाबंधनाच्या पवित्र सणाला सामाजिक बांधिलकीची जोड देत मुरगूड येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपालिका आरोग्य विभागातील महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. हुतात्मा चौक येथे झालेल्या या उपक्रमातून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या स्वच्छता कर्मचारी भगिनींच्या कार्याला मानवंदना देत कृतज्ञतेचा राखीचा धागा बांधण्यात आला.


   रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण नव्हे, तर आपुलकी, सन्मान आणि सामाजिक नात्यांची वीण घट्ट करणारा उत्सव आहे. याच भावनेला व्यापक सामाजिक स्वरूप देत सामाजिक कार्यकर्त्यांनी महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांच्याप्रती असलेला आदर व्यक्त केला.


   नगरपालिका आरोग्य विभागातील महिला स्वच्छता कर्मचारी पहाटे पाच वाजल्यापासून आपल्या कुटुंबाची दैनंदिन जबाबदारी सांभाळत शहराच्या स्वच्छतेच्या सेवेसाठी बाहेर पडतात. उन्हाळा, पाऊस असो वा सणवार, शहर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी त्यांची सेवा अविरत सुरू असते. त्यांच्या श्रमामुळेच मुरगूड शहराच्या स्वच्छतेला आणि आरोग्याला बळ मिळते. त्यांच्या या योगदानाची दखल घेत त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.


   या वेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी महिला स्वच्छता कर्मचारी भगिनींना राखी बांधली. विशेष म्हणजे, स्वच्छता कर्मचारी भगिनींनीही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मनगटावर राख्या बांधून भाऊ-बहिणीच्या नात्याला अनोखी ऊब दिली. त्यामुळे रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणित झाला. सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना मायेची साडी भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.


   सकाळच्या प्रसन्न वातावरणात झालेल्या या अनोख्या उपक्रमाने हुतात्मा चौकातून जाणाऱ्या मुरगूडकरांचे लक्ष वेधून घेतले. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कष्टांना सलाम करत रक्षाबंधन साजरे करण्याच्या या उपक्रमाचे शहरात दिवसभर कौतुक झाले. सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि कृतज्ञतेचा सुंदर संदेश देणारा हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

 

  यावेळी सर्जेराव भाट, प्रकाश परिषवाड, ओंकार पोतदार, सुभाष अनावकर, प्रफुल्ल कांबळे, संकेत शहा, शिवाजी चौगले, धनंजय सूर्यवंशी, अक्षय पोतदार, भोला सुतार, बबन बारदेशकर, मुकादम भिकाजी कांबळे यांच्यासह नगरपालिका आरोग्य व स्वच्छता विभागातील कर्मचारी तसेच महिला स्वच्छता कर्मचारी भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


   शहर स्वच्छ ठेवणाऱ्या हातांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम केवळ रक्षाबंधनापुरता मर्यादित न राहता, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या श्रमाचा सन्मान करण्याचा सामाजिक संदेश देऊन गेला.

    

   


             _--------------------------