कोल्हापूर न्यूज नेटवर्क
पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे आणि ऐतिहासिक शासकीय रुग्णालय असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर), कोल्हापूर येथील विविध नूतनीकरण व आधुनिकीकरण कामांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत फीत कापून करण्यात आले.
रुग्णालयाच्या ऐतिहासिक वारसास्थळाचे जतन करत रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध कामे करण्यात आली असून, त्यासाठी ६०० कोटी रुपयांहून अधिक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी सीपीआर रुग्णालयाच्या ऐतिहासिक वाटचालीसह नूतनीकरण व आधुनिकीकरणाच्या कामांवर आधारित लघुपट दाखविण्यात आला. तसेच रुग्णालयाची प्रतिमा मान्यवरांना भेट देण्यात आली.
या नूतनीकरणामध्ये रुग्णालयाची मुख्य प्रवेशद्वार कमान, मॉड्युलर बर्न आयसीयू, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, मॉड्युलर आयसीयू, एम.आर.आय. विभाग, अत्याधुनिक निदान व उपचार सुविधा, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा शेड तसेच विविध वैद्यकीय विभागांचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे सीपीआर रुग्णालयातील आरोग्य सेवांची क्षमता आणि गुणवत्ता अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
याशिवाय रुग्णालयातील विविध इमारतींची दुरुस्ती, रस्ते व परिसर विकास, विद्युत व्यवस्था, फर्निचर, विविध विभागांचे बांधकाम व आधुनिकीकरण, ट्रॉमा केअर सेंटर, अत्याधुनिक ऑपरेशन सुविधा तसेच विविध मॉड्युलर कामे करण्यात आली आहेत. या सुविधांमुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना अधिक सक्षम, आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शासकीय आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, महापौर रूपाराणी निकम, खासदार धनंजय महाडिक, खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, प्रधान सचिव धीरज कुमार, आयुक्त अनिल भंडारी, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे आदी उपस्थित होते.
-----------------------


