मुरगुडच्या मॅट वरून जागतिक कुस्तीच्या मैदानात! डबल महाराष्ट्र केसरी अमृता पुजारीची ७२ किलो गटात भारतीय संघात निवड; अमेरिकेतील U-23 जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व

Kolhapur news
By -

 


                   

             




                      कोल्हापूर न्यूज नेटवर्क


लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय (SAI) कुस्ती संकुल, मुरगुडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. संकुलातील डबल महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी हिची ऑक्टोबर २०२६ मध्ये अमेरिकेत होणाऱ्या २३ वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी ७२ किलो वजनगटात भारतीय कुस्ती संघात निवड झाली आहे. अमृताच्या या निवडीने मुरगुडच्या कुस्ती परंपरेला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून दिले आहे.


अमृतासाठी २०२६ हे वर्ष यशाची नवी उंची गाठणारे ठरले आहे. मार्च महिन्यात महिला महाराष्ट्र केसरीची प्रतिष्ठेची गदा दुसऱ्यांदा पटकावत तिने महाराष्ट्रातील महिला कुस्तीवर आपली पकड मजबूत केली. त्यानंतर मे २०२६ मध्ये व्हिएतनाम येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करत तिने आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली ताकद सिद्ध केली. या दमदार कामगिरीनंतर आता अमेरिकेतील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवत अमृताने आपल्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.


महाराष्ट्र केसरी ते आशियाई पदक आणि आता जागतिक अजिंक्यपदाची संधी, असा अमृताच्या यशाचा प्रवास कुस्तीपटूंच्या नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सातत्यपूर्ण सराव, मेहनत, जिद्द आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करण्याची भूक यामुळे तिने अल्पावधीतच उल्लेखनीय कामगिरी केली आहे.


अमृताच्या या यशामागे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक दादासो लवटे आणि दयानंद खतकर यांचे कौशल्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. तांत्रिक कौशल्य, डावपेच, शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक तयारी यावर त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फलित अमृताच्या सातत्यपूर्ण कामगिरीतून दिसून येत आहे.


अमृताच्या भारतीय संघातील निवडीबद्दल संकुलाचे प्रमुख माजी खासदार संजय दादा मंडलिक, कार्याध्यक्ष ॲड. विरेंद्र भैय्या मंडलिक, SAI चे माजी राज्य समन्वयक चंद्रकांत चव्हाण, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी उपायुक्त सुनील चव्हाण आणि डॉ. प्रशांत अथनी यांनी अमृताचे तसेच प्रशिक्षक दादासो लवटे व दयानंद खतकर यांचे अभिनंदन केले.


अमृताने अमेरिकेतील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतासाठी पदकाची कमाई करून मुरगुडच्या कुस्ती संकुलाचे आणि महाराष्ट्राचे नाव आणखी उंचवावे, अशा शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या.



        -----------------------------