कोल्हापूर न्यूज नेटवर्क
सांगली : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, संपादक व सिद्धहस्त लेखक शिवराज काटकर यांची निवड झाली असून, सांगली येथे झालेल्या भव्य-दिव्य सोहळ्यात त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. महाराष्ट्रासह देशभरातील पत्रकारांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या सोहळ्याला ६०० पेक्षा अधिक पत्रकारांची उपस्थिती होती.
पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढणाऱ्या आणि पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या शिवराज काटकर यांच्यावर आता परिषदेची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सांगली जिल्ह्याला प्रथमच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षपद मिळाल्याने जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांच्या संघटनात्मक शक्तीचे प्रतिनिधित्व करणारी देशातील अग्रगण्य पत्रकार संघटना आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतील ३५४ तालुक्यांमध्ये परिषदेच्या शाखा कार्यरत असून, महाराष्ट्राबाहेरही दिल्ली, पणजी, बेळगाव, विजापूर, इंदूर, हैदराबाद आदी ठिकाणी परिषदेचे कार्य विस्तारले आहे. देशभरातील सुमारे ११ हजार पत्रकार परिषदेशी जोडले गेले आहेत.आचार्य अत्रे, पा. वा. गाडगीळ, अनंत भालेराव यांसारख्या दिग्गज पत्रकारांनी ज्या संस्थेचे अध्यक्षपद भूषविले, त्या गौरवशाली परंपरेत आता शिवराज काटकर यांच्या नावाची भर पडली आहे.
शिवराज काटकर हे बेळगाव तरुण भारतच्या सांगली आवृत्तीचे संपादक आहेत. पत्रकारिता आणि सामाजिक चळवळीशी त्यांचे घट्ट नाते असून, पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी झालेल्या आंदोलनांमध्ये त्यांनी सातत्याने सक्रिय सहभाग घेतला आहे.
हाडाचे पत्रकार आणि सिद्धहस्त लेखक म्हणून परिचित असलेल्या काटकर यांनी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात पत्रकारांसाठी प्रशिक्षण शिबिरे, मार्गदर्शनपर उपक्रम आणि विविध संघटनात्मक कार्यक्रम राबविले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या वडिलांचाही परिषदेच्या कार्याशी जवळचा संबंध होता. त्यामुळे पत्रकार संघटनेच्या कार्याचा हा वारसा आता शिवराज काटकर यांच्या माध्यमातून पुढे जाणार आहे.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री. एस. एम. देशमुख यांच्या हस्ते शिवराज काटकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी काटकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला मावळते अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विश्वस्त शरद पाबळे, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, डिजिटल मीडिया परिषदेचे प्रमुख अनिल वाघमारे, मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र गांगण, कार्यवाह पांडुरंग म्हस्के यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी व ६०० पेक्षा अधिक पत्रकार उपस्थित होते.
यावेळी मुंबई प्रेस क्लबच्या नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचा एस. एम. देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच उदगीर अधिवेशन यशस्वी केल्याबद्दल सचिन शिवशेट्टे आणि त्यांच्या टीमचाही विशेष गौरव करण्यात आला.
अध्यक्षपदी शिवराज काटकर यांची निवड झाल्यानंतर सांगली शहरातून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. एस. एम. देशमुख आणि शिवराज काटकर उघड्या जीपमधून मिरवणुकीत सहभागी झाले. यावेळी पत्रकार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत नवनिर्वाचित अध्यक्षांचे अभिनंदन केले.
पत्रकारांच्या हक्कांसाठी संघर्ष, पत्रकारितेची विश्वासार्हता जपणे, नवोदित पत्रकारांना प्रशिक्षण देणे आणि राज्यातील पत्रकारांची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करणे, या दृष्टीने शिवराज काटकर यांच्या नेतृत्वाकडे पत्रकारांचे लक्ष लागले आहे.
पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे वातावरण
पत्रकारिता क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्व, दैनिक तरुण भारतचे आवृत्ती संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार शिवराज काटकर यांची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याने पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मराठी पत्रकारितेच्या प्रदीर्घ परंपरेला नवी दिशा देणारी आणि पत्रकारांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडणारी ही निवड असल्याची भावना यावेळी उपस्थित पत्रकार व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या सत्कार समारंभास डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, प्रदेश सदस्य जितेंद्र सिरसाट, प्रदेश उपाध्यक्ष अनिल उंबरकर तसेच दैनिक लोकनायकचे मुख्य व्यवस्थापक विश्वभर मुळे उपस्थित होते. मान्यवरांनी नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष शिवराज काटकर व मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांचा पुष्पगुच्छ देऊन व शाल श्रीफळाने सत्कार करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पत्रकारांच्या प्रश्नांसाठी संघटित लढा उभारणारे शिवराज काटकर सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही केवळ पत्रकारांची संघटना नसून पत्रकारांच्या हकासाठी, स्वाभिमानासाठी आणि पत्रकारितेच्या मूल्यांच्या रक्षणासाठी सातत्याने कार्य करणारी चळवळ आहे.आजच्या बदलत्या माध्यमविश्वात पत्रकारांसमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव, पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, आर्थिक अडचणी, ग्रामीण व छोट्या शहरांतील पत्रकारांच्या समस्या तसेच पत्रकारितेची विश्वासार्हता टिकविण्याचे मोठे आव्हान असल्याचे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारताना सर्व स्तरातील पत्रकारांना सोबत घेऊन संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. त्याचा आवाज दाबला जाणार नाही, त्याचे प्रश्न दुर्लक्षित होणार नाहीत आणि पत्रकारितेची मूल्ये जपण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून अधिक ताकदीने काम केले जाईल, असा विश्वास शिवराज काटकर यांनी व्यक्त केला.
ग्रामीण पत्रकार, डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणारे पत्रकार आणि पारंपरिक वृत्तपत्र माध्यमातील पत्रकार यांच्यात समन्वय निर्माण करून पत्रकारांच्या सर्वांगीण प्रश्नांसाठी व्यापक लढा उभारणार असल्याची त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी एस.एम. देशमुख, सतीश भिंगे, किशोर पुजारी, नंदकुमार निचळ, संतोष रणदिवे, अंकुश मुंढे, किरण पुजारी यांच्यासह राज्यभरातून आलेले पत्रकार उउपस्थित हाेते.
-------------------








